भाजपची राष्ट्रवादीला छुपी मदत : शिवसेनेचाआरोप

 

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत. बारणे यांच्या उमेदवारीच्या विरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांचा “बोलविता धनी’ जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्‍तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी चालवली असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपवर केला आहे.

एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता रविवारी (दि. 10) शहरात आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या सात नगरसेवकांनी निवेदन देऊन खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे यात नमूद केले आहे. बारणे यांच्या पराभवास भाजप कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये, असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज (दि.11) प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

बारणे यांच्या लोकप्रियतेने हवालदिल झालेल्या भाजप नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नितीन गडकरी यांना भाजप नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा सल्ला देण्यापेक्षा महापालिकेतील चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याकडे लक्ष घालण्यास भाग पाडणे आवश्‍यक होते, असा टोलाही त्यांनी लगाविला आहे. देशात शिवसेनाचा नाही. तर, भाजपचा पंतप्रधान होण्यासाठी युती हवी, अशी हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारांची, सर्वसामन्य जनतेची इच्छा आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच खासदार बारणे यांच्या विरोधात भाजपने पत्रकबाजी सुरू केल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी ही पत्रक बाजी चालवली आहे. बारणे यांच्या नावाला विरोध करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपवासी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वाश्रामीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन प्रसिद्धी मिळवत आहेत.

या पत्रकावर शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, जितेंद्र ननावरे, रोमी संधू या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.