भाजपचा नारा जय हिंद सोडून “जिओ’ हिंदकडे

सिताराम येचुरी : मोदींकडून खासगीकरण करून अंबानींना पोसण्याचे काम
सोलापूर :  देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात खासगीकरणाचा प्रकार सुरु आहे. उद्योगपतींना दोन लाख कोटी रुपयांचा करमाफ केला आहे, तर गरीबांच्या हातात मात्र काहीच दिले नाही. खासगीकरण करून अंबानींना पोसण्याचे काम मोदी सरकारने सुरु केले आहे. त्यामुळे आता भाजपचा नारा जयहिंद वरुन जिओ हिंद असा झाला आहे, अशी टिका माकपचे माजी खासदार सिताराम येचुरी यांनी केली.

माकपचे उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ येचुरी सोलापुरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येचुरी म्हणाले की, मोदी सरकारचा आज हिंदूत्ववादी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. घुसघोरीला लगाम घालण्याच्या नावाखाली हिंसा, अत्याचार सुरु आहे. सरकारविरुध्द बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे. मंदी, नोटाबंदी, जीएसटी यासारख्या जीवन उद्‌ध्वस्त करणाऱ्या मुद्द्यांना सोडून भावनिक मुद्द्यांना हात घालून निवडणूका लढविल्या जात आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी संपूर्ण आयुष्य जनमाणसासाठी खर्ची करणाऱ्या माकपच्या उमेदवारांच्या मागे सर्वांनी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आडम मास्तर म्हणाले, मी विजयी होवू नये यासाठी विरोधी पक्ष माझ्याबद्दल अफवा पसरवत आहे. खोटे बोलत आहे. सोलापूरसारख्या स्मार्ट शहरात उद्योगधंदे, पयाभूत सुविधा नाहीत. विमानसेवा देखील देऊ शकत नाही, तर उद्योगधंदे काय देणार? दोन देशमुखांनी शहराची वाट लावली आहे. विडी उद्योगधद्यांमध्ये 65 हजार महिला आहे. विडी कामगार महिलांना किमान वेतन, पेन्शनचा प्रश्‍न आहे. ती मदत देखील भाजप सरकारला देता नाही. या सर्व प्रश्‍नांवर आपण निश्‍चितपणे विधानसभेत मांडू.

Leave A Reply

Your email address will not be published.