भांबोली बाजाराची जागा खासगी व्यक्तिला देण्याचा घाट

ग्रामस्थ आक्रमक ः एमआयडीसी प्रशासनाने फसवणूक केल्याचा आरोप

शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील (क्षेत्र 23.5 आर) प्लॉट भांबोली ग्रामपंचायतीला भाजी मंडईसाठी देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु एमआयडीसी प्रशासनाने हा प्लॉट इतर व्यक्तीला दिल्याच्या निषेधार्थ भांबोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी रविवारी भाजी मंडईत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी भांबोलीचे सरपंच सागर निखाडे म्हणाले, एमआयडीसीने आमची फसवणूक केली असून स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय केला आहे. भाजी मंडईच्या जागेचा ताबा सोडणार नाही.

यावेळी राष्ट्रवादी पश्‍चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, गोविंद राऊत, जालिंदर राऊत, शरद निखाडे, दशरथ पिंजण, शरद वाडेकर, एकनाथ राऊत, दशरथ राऊत, तरकारी व्यावसायिक योगेश घुलेसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. दीड वर्षांपासून एमआयडीसीला वासुली फाट्यावरील भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर भरणारा आठवडे बाजारासाठी पाणीपुरवठा योजनेच्या 8.5 आर क्षेत्राशेजारील 23 आर जागेची मागणी केली होती. एमआयडीसीच्या परवानगी नंतरच या ठिकाणी दीड वर्षांपासून भाजी मंडई चालू करण्यात आली आहे.

याठिकाणी भांबोली, वासुली, शिंदे, सावरदरी, शेलू, आसखेड परिसरातील स्थानिक शेतकरी व तरुण ज्यांना औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळाला नसल्याने कोणी किराणा माल, मसाले, भाजी, फळे तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंची विक्री करुन आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. स्थानिक शेतकरी व तरुणांना आठवडे बाजाराच्या निमित्ताने रोजगार व उत्पन्न मिळण्यासाठी या जागेत प्रशस्त, सर्व सोयी सुविधांयुक्त आठवडे बाजाराच्या उदात्त हेतूने एमआयडीसीकडे हेतुपुर्वक मागणी केली होती. याठिकाणी भांबोली ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी, लाईट, वृक्षारोपण करून मंडईचे नुतनीकरण व सुशोभिकरण केले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या जागेच्या सपाटीकरण व मुरमीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

परंतु एमआयडीसी प्रशासनाने भांबोली ग्रामपंचायतीला दिलेला शब्द डावलून एका व्यक्तीला परतावा म्हणून आठवडे बाजाराची जागा दिली आहे, अशी माहिती भांबोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना समजताच आज आठवडे बाजारात एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांना येथे रोजगार मिळतो आणि येथील आठवडे बाजार उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे एमआयडीसी प्लॉट नं. ओएस. 46 हा प्लॉट भाजी मंडई व गावच्या विविध विकासकामांसाठी ग्रामपंचायतीला मिळणेबाबत खेडचे आमदार सुरेश गोरे व एमआयडीसीकडे मागणी केली आहे.

येथील जागा एमआयडीसीने ताब्यात घेतलेल्या स्थानिक शेतकरी व तरुणांचा रोजगाराचे साधन जाईल. भाजीपाला व अन्य व्यवसाय पुन्हा रस्त्यावर येऊन वाहतुकीची समस्या निर्माण होईल. भांबोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने एमआयडीसीकडे या जागेचा ताबा देण्यासाठी सोमवारी विनंती करणार असल्याचे अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करणार असल्याचे शरद निखाडे, जालिंदर राऊत, गोविंद राऊत यांनी सांगितले.

आमचे गावरान व देवस्थानची जमीन संपादित झाली असून, गावाच्या विकासासाठी मंडईच्या जागेसह (23 आर) पाच एकर जागेची मागणी केली होती. त्यावेळी एमआयडीसीने दिलेल्या जागेपैकी 2.5 एकर जागा कोब्रा कंपनीला देऊ केली. आणि तुम्हाला दुसरीकडे 2. 5 एकर जागा काढून देतो असे एमआयडीसीने सांगितले. आम्ही त्यावेळी ऐकले, आम्ही थांबलो. मग आता एमआयडीसीने आठवडे बाजारासाठी हा प्लॉट आम्हाला द्यावा आणि त्या व्यक्तीला दुसरीकडे काढून द्यावा, अशी विनंती आहे.
-सागर निखाडे, सरपंच भांबोली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)