भांडत बसलात तर दोघांचेही नुकसानच

सरसंघचालकांकडून भाजप- शिवसेनेला खडेबोल

नागपूर : आपापसात भांडत बसल्यास दोघांचेही नुकसानच होते, असा सूचक इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यावरून भाजप आणि शिवसेनेतील तीव्र मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे वक्‍तव्य विशेष सूचक आहे. “या मुद्दयावरून आपापसात भांडत बसल्यास दोघांचेही नुकसानच होणार आहे, हे सर्वांना माहिती आहे.’ असे भागवत म्हणाले. आंतरराष्ट्रीय मुख्याध्यापक शिक्षण परिषद-2019 मध्ये ते बोलत होते.

“स्वार्थीपणा वाईट असतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र फारच कमी लोक स्वार्थ सोडून देतात. देशाचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे उदाहरण बघितले तरी हेच दिसते.’ असेही ते म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढवली. मात्र सत्ताविभाजनाच्या मुद्दयावरून झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही पक्षांमधील युती तुटली आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षांना सरसंघचालकांनी खडे बोल सुनावले आहेत.

शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळतील याकडेच लक्ष न देता विद्यार्थ्यांमध्ये विशेष सद्‌गुणांची जोपासना करावी, असे आवाहन भागवत यांनी शिक्षणतज्ञांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.