भांडगाव येथे घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद

सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांनी घेतला शोध

यवत- भांडगाव (ता. दौंड) येथील अष्टविनायक कॉम्प्लेक्‍समधील बंद फ्लॅटचे कुलूप-कोयंडा तोडून भरदिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. या घटनेचे दोन आरोपींचे मोटरसायकलवरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते.
अजय राजू अवचिते (वय 24, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) आणि लक्ष्मण ऊर्फ बंटी वामन माने (वय 27, रा. लोणंद, ता.खंडाळा, जि. सातारा) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, 16 जानेवारीला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडगाव येथे भरदिवसा बाराच्या सुमारास अष्टविनायक कॉम्प्लेक्‍समधील बंद फ्लॅटचे कुलूप-कोयंडा उचकटून अडीच तोळ्याचा एक राणीहार, एक तोळे वजनाचे नेकलेस, तीन ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, तसेच रोख रक्कम असा एकूण 65 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला होता. त्याबाबत गोरख केरू परभाणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचा तपास यवत पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून चालू होता. तपासात पोलिसांना मोटरसायकलवरील दोन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. या पुराव्यावरून पूर्वीच्या रेकॉर्डवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या फोटोची पडताळणी करून एका आरोपीचे वर्णन मिळतेजुळते असल्याने त्यास लक्ष करून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, दत्तात्रय गिरीमकर, रवी कोकरे, अनिल काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, विजय कांचन, धीरज जाधव, सचिन गायकवाड, अक्षय जावळे यांच्या पथकाने अजय राजू अवचिते आणि त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ बंटी वामन माने या दोघांना ढवळगाव (जि. अहमदनगर) येथून सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यवत करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)