भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतील-मनोहर जोशी

योग्यवेळी उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील
मुंबई :  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी मांडलेल्या भूमिकेमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पुन्हा कधीच भाजपबरोबर जाणार नाही असे म्हणता येऊ शकणार नाही. भविष्यात ते एकत्र येऊ शकतील. योग्यवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे जोशी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्याने शिवसेना आणि भाजप या जुन्या मित्रपक्षांमध्ये फाटाफूट झाली. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे उद्धव यांनी स्वीकारली. मात्र, मंत्र्यांचे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार या प्रक्रिया अजूनही रखडल्या आहेत. त्या पक्षांची विचारसरणी भिन्न असल्याने त्यांचे सरकार किती काळ टिकणार, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

अशातच जोशी यांनी तर्क-वितर्कांना खतपाणी घालणारी भूमिका मांडली आहे. शिवसेना आणि भाजपने एकत्र रहावे, अशी इच्छा त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून झगडत बसण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्यात. आपल्या आग्रहाच्या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात. एकत्र काम करणं दोन्ही पक्षांच्या फायद्याचेच ठरेल, असे त्यांनी म्हटले. अर्थात, सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य असावं असे वाटत नाही, अशी पुस्तीही जोशी यांनी जोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.