भविष्यात पाणीप्रश्नावरुन संघर्ष अटळ

वळसे पाटील ः मागणी अर्ज न भरल्याने पाण्याला मुकावी लागण्याची वेळ

टाकळी हाजी-भविष्यात पाणीप्रश्नावरुन संघर्ष अटळ असून, शेतकऱ्यांनी पाणीमागणी अर्ज व पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. अन्यथा शेतीसाठी पाण्याला सर्वांनाच मुकावे लागणार असल्याचा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

पराग कारखान्यामार्फत निमगाव दुडे व भीमाशंकर कारखान्यामार्फत टाकळी हाजी येथील चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, या छावण्यांची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी दुष्काळच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना त्यांनी पाणीप्रश्नावरुन मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी छावणीमधील जनावरांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, आपले शेतकरी पाणी मागणी अर्ज भरत नसल्याने, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. शेतकऱ्यांनी भविष्यात आपले पाणी मागणी अर्ज भरुन पाटबंधारे विभागाकडे मागणी कळवली नाही तर, पुढील कित्येक पिढ्यांना आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दुष्काळाची दाहकता गंभीर असल्याने त्यांनी शिरूर तालुक्‍यात पाबळ व टाकळी हाजी येथे भीमाशंकर कारखान्यामार्फत चारा छावण्या चालू करून पशुधन जगवण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले आहे. बेट भागात जांबूत या ठिकाणी देखील आणखी एक चारा छावणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू करण्याची विनंती केली. तसेच पराग कारखान्याने व भीमाशंकर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी समजून या भागातील पशुधनाला न्याय देण्याचे काम केल्याने त्यांनी भीमाशंकरचे अध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील व पराग कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांचे आभार मानले. चारा छावणीची मंजुरी जूनअखेर असून, मुदत वाढ करावी अशी मागणी गावडे यांनी केली.

यावेळी भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, परागचे अध्यक्ष यशवर्धन डहाके, भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, प्रकाश पवार, भीमाशंकरचे संचालक रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, विलास लबडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सरपंच दामू घोडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, परागचे व्यवस्थापक विनायक नेमाडे, भीमाशंकरचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, पराग ऍग्रोचे मुख्य शेतकी अधिकारी आढाव, योगेश थोरात, दीपक दुडे, बाळासाहेब पानगे, गबाजी पिंगट, गोंविद नरवडे, भाऊ दुडे, संदीप गायकवाड, बंडू कांदळकर, विजय दुडे, आदि मान्यवर उपस्थित होते

  • पाणी मागणी अर्ज भरुनसुद्धा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करून, पाणी पळविले तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
    -दिलीप वळसे पाटील, आमदार आंबेगाव-शिरूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.