भरमसाठे भाडे अन्‌ मोडक्‍या सीटमुळे प्रवाशांचा त्रागा

लोणंद, दि. 30 (प्रतिनिधी) – पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटी महामंडळानेही एसटीभाड्यात वाढ केली. मात्र, भाडे वाढलेले असले तरी प्रवाशांना एसटी प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत. फलटण ते पुणे दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सीटची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बसायला जागा नसली तरी एसटी महामंडळा तिकिटातील रुपयादेखील कमी करत नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
फलटण येथून पुणे लोणंद मार्गाने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या निमआराम बस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सदर बसचे भरमसाठ भाडे असूनही सुविधांच्या नावाने वाणवा असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. फलटण आगाराच्या फलटण ते पुणे दरम्यान धावणारी निमआराम गाडी (क्रमांक एमएच 14 बीटी 4816) एशियाड गाडीचा तिकीट दर पुणे लोणंद 140 रुपये एवढा प्रचंड आहे. या गाडीत पाच सिट मोडलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे पैसे खर्च करूनही प्रवाशांना बसण्यासाठी सीट मिळत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचे व वाहकांचे वारंवार खटके उडत आहेत. गाडीत बसायला मिळत नाही तर ऐवढे पैसे कशासाठी घेता? असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. अशा मोडकळीस आलेल्या गाड्या फलटण पुणे असे चांगले उत्पन्न असलेल्या मार्गावर कशासाठी चालवत आहेत असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यावेळी लोणंद येथील संतप्त प्रवाशांनी मोडकळीस आलेल्या सीट लवकर बदलल्या नाहीत तर प्रवासाचे तिकिट भाडे देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

संध्याकाळी सात नंतर लोणंदमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या या लोणंद शहरात न येता सुमारे अर्धा किलोमिटर लांब असलेल्या शहराबाहेरील अहिल्यादेवी होळकर चौकातच प्रवाशांना उतरवत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याची वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
राजाभाऊ खरात ( स्थानिक प्रवासी).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)