भरधाव वाहनाने पादचारी कामगारास चिरडले

वाकी-कंपनीत पहिल्या पाळीसाठी कामावर वेळेवर पोहचण्याकरिता तातडीने निघालेला कामगार रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला. कुरूळी गावच्या हद्दीत पुणे – नाशिक महामार्गावर हा अपघात सोमवारी (दि. 23) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारस झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटना स्थळी न थांबता वाहनासह तसाच पुढे भरधाव निघून गेला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण मारुती कोंपलवाडकर (वय 44, सध्या रा. कुरुळी, ता. खेड; मूळ रा. खंडगाव, पो. बोमनवाळी, ता. कंधार, जि. नांदेड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. गोविंद विश्वंभर कोंपलवाडकर यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लक्ष्मण व गोविंद कोंपलवाडकर हे चुलते-पुतणे गेल्या सहा महिन्यांपासून चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी गावच्या हद्दीतील स्पायसर इंडिया प्रा. लि. या कंपनीत रोजंदारीवर कामाला जात होते. सोमवारी दोघे संबंधित कंपनीत पहिल्या पाळीसाठी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या खोलीतून निघाले होते. पुणे – नाशिक महामार्गावर आल्यानंतर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव निघालेल्या पांढऱ्या रंगाच्या कारची (एमएच 14/5425) लक्ष्मण यांना जोराची धडक बसली. या अपघातात लक्ष्मण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सबंधित वाहनचालक मात्र घटनास्थळी न थांबता वाहनासह तसाच पुढे भरधाव निघून गेला. लक्ष्मण कोंपलवाडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी येथील पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27 ) रात्री उशिरा अनोळखी फरारी वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)