भरतगावजवळ शिवशाही उलटली

18 जण जखमी

नागठाणे, दि. 25 (प्रतिनिधी)- पुणे- बंगळूर महामार्गावर भरतगाव (ता. सातारा) येथे आज सकाळी ‘शिवशाही’ बस पलटी झाली. या अपघातात 18 जण जखमी झाले.
पिंपरी-चिंचवड येथून चिपळूणला जाणारी शिवशाही बस सकाळी 5.30 वाजता सुटली होती.या बसमध्ये 24 प्रवासी प्रवास करत होते. महामंडळाची असणाऱ्या या बसवर महामंडळाचेच बजरंग बारीकराव ठाकरे (रा.यमुनानगर,निगडी,पुणे) हे चालक व संतोष सुभाष वाघमारे (रा.मोशी,ता.हवेली,पुणे) हे वाहक म्हणून होते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणारी ही शिवशाही बस महामार्गावरील भरतगाववाडी गावच्या उड्डाण पुलावर आली असता अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस प्रथम दुभाजकावर चढली.आणि तशीच महामार्गावर पलटी होत घसरत गेली. यावेळी बस संपूर्णपणे महामार्गाला आडवीच झाली होती.तर बसचे तोंड पुन्हा साताराकडे झाले होते.
अपघात झाल्याचा आवाज व प्रवाश्‍यांच्या किंकाळ्यानी भरतगाव व भरतगाववाडी येथील ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली.यावेळी बसच्या काचा फोडून ग्रामस्थांनी बसमधील जखमी प्रवाश्‍याना बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने सातारा येथे पाठविण्यात आले. या अपघातात चालकासह बसमधील मारे 18 प्रवासी जखमी झाले असून यापैकी एक लहान मुलगा व एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बोरगावचे सपोनि संतोष चौधरी व पोलीस कर्मचारी तात्काळ उपस्थित झाले.तसेच सातारा तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा व त्यांचे सहकारीही उपस्थित झाले. बस महामार्गावरच पलटी झाल्याने कराड बाजूकडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी सेवा रस्त्याने वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतूक पूर्ववत झाली. पलटी झालेली बस सरळ करण्यासाठी आलेल्या नागठाणे येथील क्रेन चालकाचा मुलगा बसवर चढून क्रेनची साखळी जोडत असतानाच अचानक वरून खाली बसमध्ये पडल्याने त्याच्याही डोक्‍याला गंभीर मार लागल्याने जखमी झाला. त्यालाही तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर शिवशाही बस महामार्गावरून बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीने महामार्गावर पडलेले डिझेल पाण्याच्या सहाय्याने धुवून काढल्यावर दुपारी महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)