“ब’ कार्यालयाकडून 2,226 अतिक्रमणांवर कारवाई

वाकड – अतिक्रमण करुन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर “ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत मागील आर्थिक वर्षात 2 हजार 226 जणांवर कारवाई करत सुमारे सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे. इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या तुलनेत “ब’ क्षेत्रीय कार्यालयाची कामगिरी सरस मानली जाते.

महापालिकेच्या “ब’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22 अशा चार प्रभागांचा समावेश होतो. क्षेत्रफळानुसार या कार्यालयाची हद्द बरीच मोठी आहे. या चारही प्रभागांमध्ये रस्त्यावर, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण खूप अधिक आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने रस्ते व फुटपाथ मोकळे करण्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी पार पाडत एप्रिल 2017 ते मार्च 2018 या आर्थिक वर्ष दरम्यान सव्वा चार लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करत अतिक्रमण करणाऱ्यांवर वारंवार कारवाईचा बडगा उगारला आहे.

रावेत, मुकाई चौक, किवळे, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड गावठाण, लिंक रोड, काळेवाडी अशा प्रमुख रहदारीच्या भागात लहान विक्रेत्यांकडून आणि फेरी व पथारीवाल्यांकडून वारंवार अतिक्रमण केले जाते. कित्येकदा विक्रेते संपूर्ण चौक, फूटपाथ व रस्त्याचा मोठा भाग व्यापून टाकत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडीबाबत अनेकदा नागरीक कार्यालयाकडे लेखी तक्रार करत असतात. त्यामुळे “ब’ क्षेत्रीय अतिक्रमण पथकाने वर्षभरात अनेकदा धडक कारवाई करत अतिक्रमण करणाऱ्यांवर काही प्रमाणात अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, असे नागरिकांचे मत आहे.

अतिक्रमण पथकाने क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक श्रीकांत बेलसरे, अतिक्रमण निरीक्षक नाना देवचक्के, राजेंद्र ढगे यांनी अतिक्रमण पथकाचे आठ मजूर व दोन वाहन चालक बरोबर घेऊन वर्षभरात ही कारवाई करत आपल्या विभागाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

या क्षेत्रीय कार्यालयात चार प्रभाग आहेत. या ठिकाणचे रस्ते व चौक नेहमीच गजबजलेले व वर्दळीचे असतात. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईसाठी नेहमीच सतर्क रहावे लागते. सध्या आमच्याबरोबर आठ मजूर व दोन वाहने आहेत. एकूण हद्दीचा विचार केला तर कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास व वेळोवेळी पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास कारवाईत अजून सातत्य ठेवता येईल.
– श्रीकांत बेलसरे, अधीक्षक, ब क्षेत्रीय कार्यालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)