ब्रोकली सुरतीचे कंद न आल्याने खासगी कंपनीला 2 लाखाचा फटका

शेतकऱ्याला मिळणार नुकसानभरपाई : चंद्रशेष ट्रेडर्स दुकानालादेखील द्यावे लागणार पैसे
पुणे – ब्रोकलीची शेतात लागवड केल्यानंतर त्याला कंद न आल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याप्रकरणी त्याला “नोन यु सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड आणि चंद्रशेष ट्रेडर्स या कंपनी’ यांनी 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश ग्राहकमंचाने दिला. अतिरिक्‍त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला.

माणिक अनंत थोरात (रा. उरुळी कांचन, खेडेकर मळा, ता. हवेली) यांनी नोन यु सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, मुख्य व्यवस्थापक, (कार्यालय, सर्वे नंबर, पिपळे-जगताप रोड, भिमा कोरेगाव, ता. शिरुर), सायन्टीफीक सिडलीग (इ) प्रा. लिचे व्यवस्थापक (कार्यालय उरुळीकांचन, ता. हवेली), मे. चंद्रशेष ट्रेडर्स, संचालक (कार्यालय, शेषराव वेअर हौसिंग, पुणे-सासवड पुलाजवळ, गौरी हॉटेलजवळ, फुरसुंगी) यांच्याविरूद्ध दावा दाखल केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तक्रारदारांची उरुळीकांचन येथे शेतजमीन आहे. विरोधी पक्षाने दिलेल्या जाहिरातीवरुन तक्रारदार थोरात यांना ब्रोकली सुरती या पिकाची माहिती मिळाली. त्यांनी त्याची लागवड करण्याचे ठरविले.

थोरात यांच्या मुलाने 1 फेब्रुवारी 2017 रोजी नोन यु सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड यांनी उत्पादित केलेले ब्रोकली सुरतीचे बियाणे चंद्रशेष ट्रेडर्सकडून खरेदी केले. बियाणे खरेदी केल्यानंतर सायन्टीफीक सिडलीगकडून तक्रारदाराने त्यांची रोपे तयार करुन घेतली. त्या रोपांची लागवड तक्रारदाराने मार्च 2017 मध्ये त्यांच्या शेतात केली. मात्र लागवड केलेल्या ब्रोकली सुरती या पिकापैकी 90 टक्के पिकाला कंद तयार झाले नाही. त्यांनी सायन्टीफीक सिडलीग व चंद्रशेष ट्रेडर्स यांना विचारणा केली. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी 19 जून 2017 रोजी गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 30 जुलै 2017 रोजी तक्रार निवारण समिती तथा उप विभागीय कृषी अधिकारी यांनी पिकाची पाहणी तक्रारदारांच्या शेताला भेट देऊन केली व अहवाल दिला. ब्रोकली सुरती पिकास कंद तयार न झाल्यामुळे तक्रारदाला बरेच नुकसान सहन करावे लागले. त्यांनी विरूद्धपक्षाला नोटीस देऊन नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र ती पूर्ण झाल्यामुळे तक्रारदाराने ग्राहकमंचाकडे दावा दाखल केला.

नोन यु सीड इंडिया प्रायव्हेट लिमीटेड यांनी लेखी जबाब दाखल केला. तक्रारदार हे शेतकरी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बियाण्याच्या टॅगवर स्पष्ट लिहिले होते की, या पिकाचे उत्पादन खरीप व रब्बीच्या हंगामी काळातच घेता येईल. मात्र तक्रारदाराने त्यांची लागवड या काळात न केल्याने त्याला कंद आले नाही. त्यामुळे नोन यु सीड इंडिया हे नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाहीत.

विरूद्धपक्षाच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, कृषी समितीच्या अहवालात बियाणे दोषपूर्ण होते असे नमूद नाही. बियाण्याच्या पॅकेटवर जो टॅग लावलेला होता. त्यावर नमूद होते की, त्यांची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली पाहिजे. मात्र तक्रारदाराने या हंगामात लागवड केली नाही. त्यामुळे ब्रोकली सुरतीचे कंद आले नाही. त्यासाठी नोन यु सीड इंडिया जबाबदार नाही.

बियाण्याच्या टॅगवर हंगामाबाबत उल्लेख होता. मात्र त्याची माहिती चंद्रशेष ट्रेडर्सला दिली होती, असा कोणताही पुरावा तिघांनी दाखल केला नाही. वास्तविक खरीप आणि रब्बीचा हंगाम नसताना नोन यु सीड इंडियाने बियाणे उपलब्ध करुन देणे उचित नाही. हंगामा व्यतिरिक्त बियाण्याची विक्री चंद्रशेष ट्रेडर्स यांनी केली. नोन यु सीड इंडियाने ती विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाने निकालात नमूद केले.

उन्हाळी हंगामात लागवडीची शिफारस नसताना नोन यु सीड इंडिया यांनी व्यापारी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून तक्रारदाराला लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान सहन करावे लागले. बियाण्यात दोष आढळला नाही तरी, विरुद्ध पक्षाच्या कृतीमुळे तक्रारदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सायन्टीफीक सिडलीग यांनी सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढता येत नाही. चंद्रशेष ट्रेडर्स यांनी बियाण्याची विक्री स्वत:च्या फायद्यासाठी केली, ही सेवेतील त्रुटी असून नुकसानभरपाई देण्यास जबाबदार ठरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)