बोरी बुद्रुक येथे विजेच्या धक्‍क्‍याने बालकाचा मृत्यू

बेल्हे- घराच्या कुंपणाला सोडलेल्या वीजप्रवाहाने चिमुरड्याचा बळी घेतल्याची घटना बोरी-बुद्रुक शिवारात घडली. या बालकाचे नाव सार्थक जालिंदर धावडे (वय 9) असे आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फोजदार लहू हिरवे यांनी दिलेली माहिती अशी की, बोरी-बुद्रुक शिवारात धावडे वस्ती येथे ऍड. आनंद शांताराम पाटील यांच्या घराजवळ शेडवजा कंपाऊंडच्या जाळीत विद्युत प्रवाह उतरून सार्थक जालिंदर धावडे (वय 9) या बालकाचा मृत्यू झाला. आनंद शांताराम पाटील हे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे धावडे वस्ती येथे घर आहे. ते येथे वास्तव्याला नसताना विद्युत प्रवाह सुरू कसा राहिला, असा प्रश्न नागरिक करीत आहे.

दरम्यान विद्युत महामंडळाचे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. या जागेचे पहिले मालक सुनील धावडे आणि आनंद शांताराम पाटील यांच्यात वाद आहेत. या जागेचा मालक कोण, याची चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन दोघांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.