बोरगावच्या महिलेवर गावगुंडांची झुंडशाही

वाडकर बंधुंसह जावली बॅंकेच्या संचालकावर गुन्हा
मेणवली, दि. 12 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील बोरगाव बुद्रुक येथील महिलेच्या पतीने केलेल्या आर्थिक व्यवहारातील पैशाच्या वसुलीसाठी रात्रीच्या वेळी महिलेच्या घरात घुसून तिच्या वृद्ध सासूसह दोन लहान मुलांशी गैरवर्तन करून संपूर्ण कुटुंबाच्या समोरच चक्क महिलेशी गैरवर्तन केले. याप्रकरणी बोरगाव गावातीलच जगदीश आनंदा वाडकर व राजेंद्र आनंदा वाडकर या दोन सख्ख्या भावासह जावली बॅंकेचा संचालक उळुंब येथील संतोष कळंबे या त्रिकूटाविरोधात वाई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे वाईच्या पश्‍चिम भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित महिला व कुटुंब या तिघा गावगुंडाच्या दहशतीने गेली दोन महिने हैराण झाले आहे. पतीशी झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे वसुलीच्या तगाद्याने महिलेला गलिच्छ प्रकाराला सामोरे जावे लागत होते. संबंधितांची गावात दहशत असल्याने पीडित कुटुंबाच्या मदतीला कुणीही पुढे येत नव्हते तर त्रिकुटाच्या आर्थिक व राजकीय वजनामुळे वाई पोलीस त्रिकुटाविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याने पीडित महिलेने जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे धाव घेतल्यानंतरच या त्रिकूटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वाई पोलिसांनी पुढाकार घेतला.
या त्रिकूटांचे जमीन व्यवहाराचे अनेक कारनामे व गैरप्रकार वाई पश्‍चिम भागासह संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून पीडित महिलेच्या पतीलाही जमिनीच्या व्यवहारात फसवून घरची जमीन लाटल्याचे पीडित महिलेचे म्हणणे असून पतिला फसवून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या भीतीने व त्रिकुटाच्या दहशतीनेच माझा पती गेले काही दिवस घरातून परागंदा झाला असल्याने पैसे वसुलीचे कारण पुढे करून हे त्रिकुट रात्री अपरात्री घरी येवून माझ्याशी गैरवर्तन करत असल्याने पीडित महिला दोन महिन्यांपासून भयभयीत झाली आहे.
जगदीश वाडकर व त्याच्या भावाच्या भीतीने गावात त्यांना कोणी कामालाही बोलावत नसल्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात त्यांच्याबरोबर कोणी बोलण्यासही धजावत नसल्याने जगणे मुश्‍किल झाल्याने संबधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेकडून करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)