बॉलीवूडच्या आकर्षणापाई मुलाचे घरातून पलायन

पोलिसांनी मुंबईमधून घेतले ताब्यात : आई-वडिलांच्या स्वाधिन

पुणे – वारजे-माळवाडी येथील एक पंधरा वर्षांचा मुलगा शाळेत जातो, असे सांगून पुन्हा घरी परतलाच नाही. जाताना त्याने नेलेला मोबाइलही बंद लागत होता. यामुळे घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनाही तपासात अडचणी येत होत्या. मात्र, त्याच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलल्यावर तो मुंबईला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या एका धाग्यावरून पोलिसांनी तब्बल सात दिवस तपास करून त्याला मुंबई येथून ताब्यात घेतले. बॉलीवूडच्या आकर्षणापाई तो मुंबईला गेला असल्याचे समजते. ही कारवाई वारजे पोलिसांनी केली.

या मुलाचे वडिल माळी काम करतात, तर आई गृहिणी आहे. हा मुलगा शाळेत जातो म्हणून गेला तो परत आलाच नाही. अल्पवयीन असल्याने वारजे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुलाकडे असलेला मोबाइलही तपासात बंद असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला शोधायचे कसे, असा प्रश्‍न पोलिसांना पडला. त्यात त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यावर आणि परिचितांशी बोलल्यावर तो मुंबईत असल्याचे आढळून आले. त्याच्या मोबाइलवर मुंबईतील एका नंबर वरून मेसेज आले होते, हा इतकाच धागा होता. आता त्यावरून मुंबई सारख्या अफाट गर्दीच्या शहरात त्याचा शोध घेणे म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखेच होते. ज्या नंबरवरून त्याच्या मोबाइलवर मेसेज गेले होते. त्या टॅक्‍सीचालकाचा पोलिसांनी शोध लावला. त्याला मुलाचा फोटो दाखविल्यावर त्याने तो ओळखला व माझ्या मोबाइलवरून त्याने त्याच्या हरविलेल्या मोबाइलवर मेसेज पाठविला होता. मी त्याला एक दिवस घरी राहायला दिले. दुसऱ्या दिवशी तो निघून गेला. इतकीच माहिती पोलिसांना मिळाली. त्यातून तो मुंबईत असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी आग्रीपाडा, भायखळा, डोंगरी मश्‍जिद बंदर अशा ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष लोकांना भेटून, फोटो दाखवून शोध सुरू केला. तेव्हा मश्‍जिद बंदर येथे एका ठिकाणी तो शनिवारी सापडला. पुण्याला आणून त्यांनी त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मौजमजेसाठी आपण मुंबईला गेल्याचे तर आई-वडिलांच्या भांडणामुळे मुंबईला गेल्याचे अशी वेगवेगळी कारणे तो सांगतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.