बैलगाडा शर्यतीसाठी राष्ट्रवादीने काय आंदोलने केली?

खासदार आढळराव पाटील यांचा सवाल ः रॅलीद्वारे पुण्यात जोरदार शक्‍तिप्रदर्शन

पुणे -बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले, आंदोलने केली. त्यामुळे आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले. असे असूनही विरोधक मात्र आमच्यावर आरोप करत आहेत; हे चुकीचे आहे, असे शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आंदोलने केली नाही, शिवाय त्यांच्यावर याबाबतचा एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचा दावा आढळराव यांनी केला.

शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर, महेश लांडगे, शरद सोनावणे, सुरेश गोरे, डॉ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समचार घेत, पंधरा वर्षे मी या भागाचे नेतृत्त्व करत आहे. प्रत्येक गावागावात माझी ओळख आहे. ही ओळख विकासकामांमधून आहे. गावागावांमध्ये निधी देऊन मी विकास कामे केली आहेत. त्याचा फायदा मला होत आहे. दुसरीकडे विरोधकांना उमेदवार सुद्धा बाहेरून आणावा लागत आहे. बैलगाडा शर्यतीवरून माझ्यावर आरोप केले जातात, पण या बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सगळ्यात जास्त धडपड मीच केली आहे. आंदोलने केली, न्यायालयीन लढाई लढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपण या शर्यतीसाठी परवानगी मागितली. त्यांनी सुद्धा परवानगी दिली होती, पण पेटा संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा उच्च न्यायालयात गेल्याने हा प्रश्‍न अडकला आहे. ही लढाई सुद्धा जिंकू याचा आम्हाला विश्‍वास आहे. यावेळी आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, शरद सोनवणे यांची ही भाषणे झाली.

  • मिरवणुकीने भरला उमेदवारी अर्ज
    नरपतगिरी चौकात जाहीर सभा झाल्यानंतर भव्य मिरवणुकीने जाऊन शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खास सजविलेली बैलगाडी आणण्यात आली होती. बैलगाडीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह मतदार संघातील पाच आमदार उपस्थित होते. त्याचबरोबर अग्रभागी ढोल-ताशांचे पथक आणि ढोली-बाजा होता. कार्यकर्त्याची सुद्धा मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीच्या मार्गावर भंडारा सुद्धा उधळण्यात येत होता. नरपतगिरी चौकातून जुन्या जिल्हा परिषद रस्त्याने ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. ढोल-ताशांच्या गजराने आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता. याशिवाय खास शिवसेनेची गाणी सुद्धा ऐकविण्यात येत होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.