बैलगाडा पळवण्याबाबत पोलिसांना धास्ती!

निमगाव दावडीत रात्री खोदला शर्यतीचा घाट

दावडी-खेड तालुक्‍यातील दावडी येथे बैलगाडा शर्यत गावकऱ्यांनी भरवू नये म्हणून यासाठी प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी गावात असलेला बैलगाडा शर्यतीचा घाट चक्क रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने खोदला आहे.

गेल्या सहा ते सात वर्षांपासून राज्यामध्ये बैलगाडा शर्यत बंदी आहे आणि याच अनुषंगाने गावागावातील यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत भरविण्यासाठी बंदी आहे; मात्र काही ठिकाणी न्यायालयाचा अवमान करून बैलगाडा शर्यती भरविल्या जात आहेत. यामध्ये पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत; मात्र ग्रामीण भागातील काही गावांमध्ये कुलदैवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती भरवल्या जातात आणि या शर्यती रोखण्यासाठी पोलीस अशाप्रकारे योजना करताना चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजेच बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलने करण्यात आली; मात्र आंदोलने करूनही बैलगाडा शर्यत न्यायालयीन चक्रामध्ये अडकली आहे. बैलगाडा शर्यती बंद असल्या तरी ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये छुप्या पद्धतीने बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत. याबाबत दावडी गावामध्ये बैलगाडा शर्यत भरवण्यात येणार असल्याची माहिती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना समजल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गावात असलेला बैलगाडा शर्यतीचा घाट रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आला आहे. त्याचप्रमाणे घाटामध्ये मोठ मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने घाट खोदल्यामुळे दावडी मधील ग्रामस्थ बैलगाडा शौकीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • दावडी गावातील बैलगाडा शर्यतीचा घाट हा आम्ही वैयक्तिक खर्चाने तयार केला असून पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता लाखो रुपये खर्च करून केलेल्या बैलगाडा शर्यत घाटाची मोठे नुकसान केले आहे.
    -केरभाऊ म्हसाडे, माजी उपसरपंच दावडी
  • दावडी गावांमध्ये बैलगाडा शर्यत होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर त्या गावांमध्ये असलेला बैलगाडा शर्यत घाट खोदला आहे. मोठ मोठे दगड त्या घाटांमध्ये ठेवण्यात आले आहेत. बैलगाडा शर्यतीवर प्रतिबंधक व्हावे यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
    -अरविंद चौधरी, निरीक्षक खेड पोलीस ठाणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.