बेरोजगारी, नोटबंदी, शेतकरी प्रश्‍नांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडणार – अजित पवार

 डॉ. काल्हे यांचा अर्ज भरतेवेळी शक्तीप्रदर्शन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक वेळी विकासाचा मुद्दा समोर ठेवत होते. विकासाच्या मुद्द्यावर ते मत मागत होते; परंतु यावेळी जुन्या मुद्द्यांवर ते कुठलेही वक्तव्य करत नाही. बेरोजगारी, जीएसटी आणि नोटबंदीवर ते काहीच वक्तव्य करत नाहीत. नोटबंदीमुळे गरिबांकडे आजही पैसा नाही. बेरोजगारी, नोटबंदी आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न याविषयी भारतीय जनता पक्षाने केलेल्या व्यक्तव्याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जाणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांच्याकडे सादर केला. उमेदवारी अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, विलास लांडे, अशोक पवार, प्रदेश उपाध्यक्ष शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी महापौर प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विविध मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. मतदारांमध्ये आपल्या पक्षाविषयी जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली का? याबाबत मतदार विचार करत आहेत. नोटबंदीनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होतील, असे मोदी यांनी सांगितले होते; परंतु कुठेही ऑनलाइन व्यवहार झालेले दिसत नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. कोल्हे म्हणाले, 15 वर्षे सत्तेत असूनही काम झालेल दिसत नाही. यामध्ये त्यांचा असलेला दृष्टीकोन दिसून येतो. अहवालात स्मशानभूमीसाठी निधी दिल्याचे म्हटले आहे. त्याऐवजी पुणे -नाशिक महामार्गावर अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींसाठी ट्रामा केअर सेंटर उभारले असते. तर लोकांना स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली नसती. बैलगाडा शर्यती बाबत त्यांनी मनेका गांधी यांची कधीही संवाद साधला नाही. कोलांटउडी मारल्याने खेडचा विमानतळ प्रकल्प गेला. त्यामुळे तरुणांचा रोजगार गेला आहे. व्यवसायाला खीळ बसली आहे.

  • राज ठाकरेंना सभेसाठी विनंती करणार
    अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी प्रचार सभेमध्ये नवीन तंत्राचा उपयोग केला आहे. यापूर्वी केलेली व्यक्तव्ये, घटना आणि त्यावर सद्यस्थिती तसेच नंतरची व्यक्तव्ये अशा स्वरुपाची माहिती स्क्रीनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहे. याची चर्चा सर्वत्र होत आहे. सत्ताधारी पक्षाला याची दखल घ्यावी लागली. तर कार्यकर्त्यांनी मागणी केली तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा शिरूर लोकसभा मतदारसंघात घ्यावी, अशी विनंती राज ठाकरे यांना करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.