बेघरांचं स्वप्न साकार होणार -ताटे

वाकी-महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता चाकण उद्योग पंढरीत वास्तव्यासाठी आलेल्या बेघर, भूमिहीन व भाडोत्री नागरिकांना राहण्यासाठी हक्काची सरकारी एक गुंठा जागा देण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला असून, येत्या हिवाळी अधिवेशनात बेघरांचा प्रलंबित प्रश्न तडीस नेण्याचा निर्धार करण्यात आल्याने बेघरांचं स्वप्न साकार होणार असल्याचा आत्मविश्वास भापसे पार्टीचे अध्यक्ष दीपक ताटे यांनी व्यक्त केला.
भापसे पार्टीच्या माध्यमातून बेघरांना राहण्याकरिता सरकारी एक गुंठा जागा मिळावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून बेघर नागरिक टाहो फोडत आहेत. त्यामुळे शासनाने बेघरांना जागा देण्यास हिरवा कंदील दाखविला असल्याने याबाबत नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बेघर नागरिकांच्या मार्गदर्शन व्यापक मेळाव्यात ताटे बोलत होते. यावेळी भापसे पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, शोभा वैरागी, जिल्हा सचिव रमेश गालफाडे, ईश्वर गवळी, समाधान ताटे, माजीदभाई आतार, ज्योती आंबेकर, कविता बछाव आदि यावेळी उपस्थित होते. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेघरांचा प्रलंबित प्रश्न तडीस लागणार असल्याने बेघर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबद्दल समाधान व्यक्त करून ताटे म्हणाले, बेघरांना राहण्यासाठी सरकारी एक गुंठा जागा मिळावी, यासाठी अडीच हजार बेघर नागरिकांचे अबक प्रपत्र सखोल माहिती भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तातडीने त्याबाबत ठोस निर्णय न घेता चालढकल करीत आहेत. राज्य सरकारने मात्र याबाबत राजपत्रामध्ये सरकारी जागेबाबत सरकारी जागा कब्जे हक्काने नाममात्र भाडे पट्ट्याने सरकारी जागा प्रदान करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेले असतानाही त्यांनी बेघर लोकांना वेठीस धरले आहे, असा आरोप ताटे यांनी केला आहे. बेघरांना जागा मिळावी, यासाठी भापसेने आजपर्यंत शेकडो आंदोलने केली आहेत. त्यामुळे बेघर नागरिक जागा मिळण्यावर ठाम असल्याने येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागून बेघरांचं स्वप्न साकार होणार आहे. जयश्री ताटे यांनी प्रास्ताविक केले. राम क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन, तर रमेश गालफाडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)