कोणीही यावे आणि छेड काढून जावे; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
शाहूपुरी – महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असताना साताऱ्यातील बुधवार नाका व आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या छेडछाडीच्या घटनांनी महिला व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातून ये-जा करणाऱ्या काही महिला व तरूणींची रोड रोमिओंकडून छेडछाड काढली जात आहे. परंतु भीती व बदनामीपोटी कोणीही पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, कोणीही यावे आणि छेड काढून जावे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा शहरालगत असलेला आकाशवाणी झोपडपट्टी परिसर, बुधवार नाका हा संवेदशील विभाग म्हणून पूर्वी ओळखला जायचा. त्याला कारणही तसे होते. मारामारी, चोरी, लुटमारीच्या अनेक घटना या भागांत अनेकदा उघडकीस आल्या आहेत. कोणत्या न कोणत्या कारणाने हा परिसर नेहमीच चर्चेला विषय ठरत असे. वाढत्या क्राईम रेटमुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. परंतू पोलीस प्रशासनाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अशा प्रकारच्या घटना अलिकडे कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही आता सुुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आकाशवाणी झोपडपट्टी व बुधवार नाका परिसर चर्चेला विषय ठरू लागला आहे.
या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिलांची व युवतींची रोड रोमिओंकडून छेड काढली जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून ये-जा करण्यास कोणीही धजावत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. परंतू भीती व बदनामीपोटी कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात नाही. या विघ्नसंतोषीना आवर घालण्यासाठी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता पोलिसांना पुन्हा एकदा कडक पावले उचलावी लागणार आहेत.