बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या पुरुष व महिला संघांची आगेकूच 

बाटुमी: झटपट बुद्धिबळ प्रकारातील जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदने चमकदार खेळ करताना प्रमुख प्रतिस्पर्धी मार्कस रॅगरचे आव्हान मोडून काढल्यामुळे भारतीय पुरुष संघाला ऑस्ट्रियाचा धुव्वा उडविताना येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत आगेकूच करता आली. भारतीय पुरुष संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. तसेच भारताच्या महिला संघानेही व्हेनेझुएलाचे आव्हान मोडून काढताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
त्याआधी तब्बल 12 वर्षांनंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत परतलेल्या आनंदने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना मार्कस रॅगरला कसलीही संधी दिली नाही. इटालियन ओपनिंगने प्रारंभ केल्यावर आनंदने रॅगरच्या वजिराच्या बाजूने आक्रमण केले व नियमित अंतराने त्याची मोहरी मारली. रॅगरने 47व्या चालीला शरणागती पत्करली. दुसऱ्या पटावर पी. हरिकृष्णाने व्हॅलेन्टिन ड्रॅग्नेव्हच्या चुकीचा फायदा घेत निर्णायक विजयाची नोंद केली.
पाठोपाठ विदित गुजराथीने आर्न्द्रेयास डिएरमेरचा फडशा पाडताना भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या चौथ्या पटावर पीटर श्रायनरने अधिबनला बरोबरीत रोखून ऑस्ट्रियाला अर्धा गुण मिळवून दिला. या विजयामुळे भारतीय संघाने एकूण 4 गुणांची कमाई केली आहे. अन्य 40 देशांसह संयुक्‍त आघाडीच्या स्थानावर असलेल्या भारतीय पुरुष संघासमोर तिसऱ्या फेरीत कॅनडाचे आव्हान आहे.
महिला गटांत पहिल्या बटावर कोनेरू हंपीच्या जागी भारताने हरिकाला खेळविण्याचा निर्णय घेतला. हरिकाने आपल्या ट्रेडमार्क आक्रमक शैलीत प्रारंभ करीत कॅरोलिना सॅंचेझला निष्प्रभ केले. कॅरोलिनाने तिला कडवी झुंज दिली. परंतु हरिकाला विजय मिळविण्यासाठी फार कष्ट पडले नाहीत. दुसऱ्या पटावर तानिया सचदेवने अमेलिया हर्नांडेझवर निर्णायक मात करताना भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या पटावर ईशा करवडेने मॅन्युएला रोव्हिराचा धुव्वा उडविताना चमकदार कामगिरीची नोंद केली. तर चौथ्या पटावर राष्ट्रीय विजेत्या पद्मिनी राऊतने पॅटिनो गार्सियाचे आव्हान मोडून काढताना भारतीय महिलांच्या एकतर्फी विजयाची पूर्तता केली. गतविजेत्या रशियाच्या महिला संघाला उझबेकिस्तानविरुद्ध 1.5-2,5 असा खळबळजनक पराभव पत्करावा लागल्यामुळे आजचा दिवस गाजला. पहिल्या तीन पटांवर रशियाला बरोबरीत रोखणाऱ्या उझबेक खेळाडूंनी अखेरच्या पटावर विजय मिळविताना रशियाला चकित केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)