बीआरटी रस्त्याचे केले गोडाऊन  

पिंपळे-सौदागर – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या बीआरटीएस मार्गांपैकी बहुतेक मार्ग धूळखात आहेत. पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते कासारवाडी बीआरटी रस्ता दोनच वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्चून बनवण्यात आला. परंतु या ठिकाणी या रस्त्याला गोडाऊनचे स्वरुप आले आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आला असून याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील समितीने केली आहे.

समितीने दैनिक “प्रभात’ ला दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक वाहतूक सुरक्षित आणि जलद गतीने होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी रस्ता प्रकल्पाचे मोठे जाळे बनवण्यात आले. परंतु योग्य नियोजनाअभावी सदरचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात अद्याप कायम स्वरूपी सुरू झाले नाही. शासनाचे यामुळे नुकसान होत आहे. शहरातील काही सामाजिक संस्था याबाबत आवाज उठवत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही याबाबत ताशेरे ओढले आहेत. तात्पुरते ट्रायल रन करून नागरिकांची तसेच न्यायालयाचीही दिशाभूल महापालिका करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक ठिकाणी संपूर्ण तयार झालेल्या नवीन बीआरटी प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जात आहे. प्रकल्पापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे बीआरटी रस्ता प्रयोगाचे स्थान फक्‍त झालेले आहे. सदरच्या बीआरटी रस्त्याचा वापर हा वाहन तळ, राडारोडा टाकण्यासाठी, काही ठिकाणी खेळाचे ठिकाण म्हणून, गोडाऊन म्हणून केला जात आहे. ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता सदरचा प्रकल्प राज्याने प्रामुख्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात राबवला होता. त्या प्रमुख उद्देशाला हरताळ फासण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिका करीत आहे.

गोविंद यशदा चौकामध्ये सध्या सब-वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम घेतलेल्या ठेकेदाराने बीआरटी प्रकल्पास पुरते नुकसान पोहचवले आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अमर आदियाल, तानाजी जवळकर, संतोष चव्हाण आणि समिती अध्यक्ष विजय पाटील यांना कुठेही सुरक्षेचे नियम पाळलेले दिसून आले नाही. त्यामुळे दुचाकी चालकांना या चौकातून जाताना जीव मुठीत धरून चालावे लागते. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या राडारोड्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. बीआरटी प्रकल्पाची काळजी घेऊनच सब-वे बनवण्यात यावा, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीस वाटते.

पाहणीत समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, सध्या शहरात बऱ्याच ठिकाणी सब-वे बनवण्याचे काम सुरू असून त्यासाठी करोडो रुपयांची तरतूद महापालिकेने केलेली आहे. सदरच्या सर्व प्रकल्पाच्या ठिकाणी महापालिका आयुक्‍तांनी भेट देवून सद्यस्थितीची पाहणी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
समिती सदस्य अमरसिंग आदियाल म्हणाले, यशदा गोविंद चौक परिसरातील बी आर टी प्रकल्पाची स्थिती दयनीय आहे. कोणतेही सुरक्षेचे नियम ठेकेदाराने न पाळल्यामुळे बस स्थानकाचे नुकसान होत आहे. काम करत असताना निर्माण झालेल्या राडारोड्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक सूचना दिशादर्शक व फलकांचा वापर कामाच्या ठिकाणी करणे क्रमप्राप्त आहे. अपघात होण्याच्या अगोदर पालिकेने योग्य नियोजन करने आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)