बिहारमध्ये होडी उलटून 8 जणांचा मृत्यू

भागलपुर – बिहारमधील भागलपुर जिल्ह्यात रविवारी दुपारी कोसी नदीत होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील सात जणांना वाचविण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोनिया टोलानगरा येथील 15 ग्रामस्थ एका होडीतून कोसी नदीच्या दुसऱ्या किनारी असलेल्या अंधारी बिंद टोली येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. हा लग्नसोहळा आटपून परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला, तर स्थानिक लोकांनी धाव घेतल्याने सात जणांना वाचविण्यात यश आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेनंतर शेकडो लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. क्षमतेपेक्षा जास्त लोक या होडीत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घटना घडली त्यावेळी या होडीतून किती लोक प्रवास करीत होते हे अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यांत बिहारमधील छपरा येथे अशाच प्रकारे नदीत होडी उलटून 15 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील बागपत येथील काठा गावात यमुना नदीत होडी पलटी झाल्याने 50 लोक बुडाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)