बिल्डरने सुविधा न देता गंडविले

कदमवाकवस्तीमधील प्रकार : दोन विकसकांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर- विकसकाने गृहप्रकल्पातील सदनिकेचा ताबा देताना खरेदी खतामधील परिशिष्ट “क’ नुसार ज्या सुविधा देणे बंधनकारक होते. त्या न देता फिर्यादी व गृहप्रकल्पातील सदनिका घेणाऱ्या इतर ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार संभाजीनगर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे उघडकीस आला. याप्रकरणी विकसकांवर महाराष्ट्र ओनरशिप कायदा (मोफा) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदाशिव बंडू झंजे (वय 38, रा. प्रथमेश कॅस्टल, फ्लॅट क्रमांक 404, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. विकसक अमोल चौधरी व स्मिता राजेंद्र चिंचोळकर, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, झंजे हे सन 2001 पासून आपल्या कुटुंबाबरोबर संभाजीनगर येथील बालाजी हाईट्‌समध्ये राहण्यास होते. तेथे त्यांना वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने ते दुसरीकडे फ्लॅट शोधत होते. ते राहात असलेल्या सोसायटीशेजारी प्रयत्न प्रथमेश डेव्हलपर्सचे मालक अमोल चौधरी व स्मिता चिंचोळकर यांनी जमिन गट क्रमांक 255 मधील हिस्सा क्रमांक 2 व 3 मध्ये प्लॉट क्रमांक 38 व 39 मधील प्रत्येकी 324 चौरस मिटर जागेमध्ये प्रथमेश डेव्हलपर्स यांचा प्रथमेश कॅस्टल नावाने गृहप्रकल्प सुरू असल्याचे समजले. याबाबतचे माहितीपत्रक वाचल्यानंतर त्यांत नमूद करण्यात आलेल्या सुविधा आवडल्यामुळे या प्रकल्पातील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 404 घेण्याचे निश्‍चित केले. विकसक चौधरी यांच्यासमवेत चर्चा केली. हा फ्लॅट 26 लाख 15 हजार 500 रुपये किमतीस घेण्याचे त्यांनी ठरवले.

दि. 5 डिसेंबर 2015 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे – 3 यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक 7213ड़ 2015 अन्वये खरेदीखत करण्यात आले. त्यानंतर दि. 26 डिसेंबर 2016 रोजी त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला. झंजे यांनी फ्लॅटची पाहणी केली असता त्यांना खरेदीखतातील परिशिष्ट “क’ नुसार ज्या सुविधा विकसकाने देण्याचे लेखी दिले होते. त्यापैकी मुख्य दरवाजास सिलेंड्रीकल लॉक, सोलर वॉटर हिटर, इन्व्हर्टर बॅकअप, एक्‍झॉस्ट फॅन आदी सुविधा दिलेल्या नव्हत्या. त्याचबरोबर सोसायटीसाठी डेकोरेटिव्ह मुख्य गेट नव्हते.

तसेच काही फ्लॅटधारकांना वाहन पार्किंगची सुविधा दिली नव्हती. येथील सर्व 15 फ्लॅटधारकांची सोसायटी तयार करून ती अद्याप सभासदांकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत नोंदणी पत्र, 8 अ, पूर्णत्वाचे, शेअर व भोगवटा प्रमाणपत्र, कन्व्हेन्स डीड, सेल डीड, सोसायटीचे बॅंक खाते, सोलर वॉटर सिस्टीम, जिन्यातील स्कर्टींग, लिफ्ट परवाना, टॅक्‍स पावत्या, रेन वॉटर पाईप लाईन, फायर फायटिंग युनिट आदी कामे पाठपुरावा करुनही आजअखेर पूर्ण केले नाही. म्हणून विकसकावर तक्रार दाखल होताच महाराष्ट्र ओनरशिप कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.