बिलिंग सिस्टीममुळे महसुलावर परिणाम

महावितरणचे आर्थिक नुकसान; वीज ग्राहकांच्या तक्रारीत वाढ
अकोले –केंद्रीय बिलिंग सिस्टीममुळे(सीबीएस) महावितरण कंपनीच्या महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
महावितरण कंपनी प्रशासनाने गेल्या 15 वर्षात माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले. त्यात प्रशासन काही ठिकाणी यशस्वी झाले; परंतु अंबलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे वेळोवेळी महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महावितरण कंपनी देशोधडीला लागली. कंपनीची आर्थिक बाजू पूर्णपणे कोलमडली आहे. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर काहीही नियंत्रण राहिलेले नाही. महावितरण कंपनीने एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रीय बिलींग पद्धत सुरू केली. प्रशासनाने लेखा विभाग व शाखा अधिकाऱ्यांना या पद्धतीची संपूर्ण माहिती द्यायला पाहिजे होती; परंतु तसे न करता प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्रात थेट प्रयोग केला व मोठया अडचणी निर्माण केल्या. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात फसला आहे. महावितरण कंपनीच्या नियमित महसुलावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. ज्या विभागाचे शंभर टक्के सामान्य बिलिंग व्हायचे, त्याचे सामान्य बिलिंग थेट साठ टक्के वर आले. मीटरचे प्रत्यक्ष रिडींग सादर केले असतानासुद्धा या प्रणालीमुळे वीज ग्राहकाला फॉल्टी, आरएनए, आरएनटीची सरासरी वीज देयके दिली गेली. त्यामुळे वीज ग्राहकांच्या तक्रारीत कमालीची वाढ झाली आहे.
उपविभाग व शाखा कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच विभागातील वीज ग्राहकांना बील भरण्यासाठी चार वेगवेगळ्या अंतिम तारीखा येतात. सात ते 13 सप्टेंबर या कालावधीत महावितरण कंपनीची ऑनलाईन सेवा बग (वायरस) आल्यामुळे बंद असल्याचे कारण सांगत कंपनी प्रशासनाने जनतेची दिशाभूल केली. गेल्या 15 वर्षांत कित्येक वेळा जास्तीत जास्त एक दिवसासाठी ऑनलाईन सेवा बंद राहायची; मात्र या वेळेस चक्क सहा दिवस “वायरस’च्या नावाखाली सेवा बंद केली गेली. या कालावधीमध्ये ऑनलाईन वीज बिल भरणारे ग्राहक अडचणीत आले. परिणामी कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. महाराष्ट्रातील ज्या शाखेच्या शाखाधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सात सप्टेंबरला नवीन वीज ग्राहकाला “फर्म कोटेशन’ (सुरक्षा अनामत) रक्कम भरण्यासाठी सादर केले, त्या ग्राहकाचा डाटा आज “ऑनलाईन सिस्टीम’ला उपलब्ध नाही. तसेच त्या दिवशी देण्यात आलेला नवीन ग्राहक क्रंमाक हा 13 सप्टेंबरला ऑनलाईन सेवा चालू झाल्यावर दुसऱ्याच नवीन वीज ग्राहकाला आला. याच कालावधीमध्ये ज्याने बिल भरणा केला, त्याच्या पावत्यासुद्धा ऑनलाईन दिसत नाही. या प्रकाराने सारेच बुचकळ्यात पडले आहेत. संपूर्ण “डाटा मिसमॅच’ आहे. वीज ग्राहकाला ऑगस्ट 2018 ची वीज देयकेच मिळालेली नाहीत. यावरून महावितरणच्या “मास्टर डाटा’शी छेडछाड झालेली आहे.
महावितरण आधीच मोठया आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येक युनिटचा पैसा आलाच पाहिजे; परंतु जर चुकीच्या पद्धतीचा वापर करत वीजबिल घेतले गेले, तर भरणारा ग्राहकसुद्धा वीज बील भरणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)