बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

संगमनेर: शेतातील उसाला पाणी देऊन घराकडे परतणाऱ्या बापलेकांच्या दुचाकीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्‌यात, बिबट्याच्या पंजाचा फटका लागल्याने, बाळासाहेब बळवंत भुसाळ (वय 59) (रा. भुसाळवस्ती, उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.2) रात्री दहाच्या सुमारास घडली.

उंबरी बाळापूर शिवारातील उसाच्या शेताला पाणी देवून रात्री 10 च्या सुमारास मुलगा संपतच्या दुचाकीवरुन घराकडे येताना, शेजारच्या शेतातून बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. मागे बसलेले बाळासाहेब यांचा उजवा हात व उजव्या पायाला गुडघ्याजवळ नख्याने जखमी केले. या बापलेकांनी आरडा-ओरड केल्याने बिबट्याने पलायन केले.

बाळासाहेब भुसाळ यांना तातडीने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. उंबरी बाळापूर परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने, हल्ल्यांची संख्या वाढली आहे. ग्रामस्थांनी या उपद्रवी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, बुधवारी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शिवाजी डांगे, वनरक्षक राजेंद्र आल्हाट, अशोक गिते, बाळासाहेब डेंगळे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.