‘बिनबुडाची; उठाठेव’

भामा- आसखेड योजनेचा श्रेयवाद शिगेला ; आजी-माजी आमदार पुन्हा आमने-सामने

पुणे :     महापालिकेच्या भामा- आसखेड योजनेमुळे गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस एक करत; पाण्यासाठी सुरू असलेली वणवन थांबणार असल्याने नगररस्ता परिसरातील नागरिकांनी सुटेकाचा नि:श्‍वास टाकला असतानाच, या योजनेचे श्रेय घेण्यावरून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांमध्ये ” बिनबुडाची; उठाठेव’ सुरू झाली आहे.

या योजनेचेचे श्रेय घेण्यासाठी विद्यामान आमदार सुनील टिंगरे काहीही काम न करता श्रेय घेण्याची उठाठेव करत असल्याची टिका माजी आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केली आहे. तर आपले अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचे सांगत टिंगरे यांनीही मुळीक यांच्यावर सडेतोड टिका केली आहे.

दरम्यान, महापालिकेकडून तब्बल 380  कोटींच्या खर्चाच्या या योजनेचे काम पूर्ण झाले असून या कामाची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे नगर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या भागाची पाण्याची समस्या कायमची सुटणार असून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील तब्बल सात ते आठ लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

श्रेय घेण्यासाठी उठाठेव – माजी आमदार मुळीक
भामा-आसखेड प्रकल्प पूर्णत्वास येत असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या वडगावशेरीच्या विद्यमान आमदारांनी या प्रकल्पासाठी शून्य निधीची तरतूद केली. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याची धडपड त्यांनी करू नये अशी टीका शहर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.भामा-आसखेड प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी टक्के काम पूर्ण झाले होते. आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून, बैठका घेऊन या योजनेला गती दिली. स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सुमारे 175 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून प्रकल्पगग्रस्त पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तगावांमध्ये विकासकामे झाली.परंतु गेल्या वर्षभरात मतदारसंघात एकही विकासकाम करता आले नाही आणि शून्य निधीची तरतूद यामुळे निराश झालेले विद्यमान आमदार न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

    आरोप बिनबुडाचे – आमदार टिंगरे
भामा आसखेड योजनेचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस-क़ॉंग्रेस आघाडीच्या काळात सुरू झाले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर वडगाव शेरीच्या तत्कालीन आमदारांना या योजनेचे काम वेळेत मार्गी लावता आले नाही. आता स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ते बिनबुड्याचे आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.
भामा आसखेड योजनेचे काम दोन वर्ष बंद होते. मुख्यमंत्री भाजपचा, पुण्याचा पालकमंत्री भाजपचा, वडगाव शेरीचा आमदार भाजपचा, महापालिकेतही भाजपचीच सत्ता एवढे सगळे असून भामा आसखेड योजनेचे काम मार्गी लावण्यात भाजप अपयशी ठरली. या योजनेसाठी जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत 380 कोटींचा निधी मंजुर झाला होता. त्याचवेळी महापालिकेचा हिस्सा ठरला होता. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी केवळ त्याची प्रकिया पुर्ण केली आपल्या कारर्किदीत काहीच करता आले नाही, या विचारातून वैफल्यग्रस्त होऊन मुळीक केवळ टिका करत आहेत. खोट बोला पण रेटून बोला अशी त्यांची कार्यपध्दती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.