बाहेरचे खाताना “या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

– डॉ. मानसी पाटील

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दरवेळेला घरचे अन्न खाणे शक्य आहे का? आपल्यापैकी असे किती जण आहेत जे बाहेरचे अन्न अजिबात खात नाहीत? किती जण पार्टीला / काही समारंभाला जाताना किंवा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाताना घरचा डबा घेऊन जातात? ’डाएट’ करणारे किती जण महिन्यातल्या एखाद-दुसर्‍या दिवशी डाएटला बुट्टी मारून बाहेरच्या खाण्यावर मनसोक्त ताव मारतात? आपल्यापैकी किती जणांना नाईलाजास्तव का होईना पण बाहेरचे / कॅन्टीनमधले अन्न नेहमी खावे लागते?

वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुमच्या असे लक्षात येईल की आपण सर्वच जण कधी ना कधी बाहेरचे खातोच. काही जण बाहेरचे खाणे प्रकर्षाने टाळत असले तरी बहुतांश लोकांना ते शक्य होत नाही आणि काही जण तर स्वतःला दोष देत तर काही जण आनंदाने बाहेरचे पदार्थ खायला तयार होतात!

बाहेर खाताना कोणते पर्याय निवडायचे हे आपल्या हातात आहे!योग्य काळजी घेतल्यास बाहेरचे खाणे नक्कीच आनंददायी होऊ शकेल. योग्य ते पदार्थ मागवा. इथेच बर्‍याचदा आपण चुकतो! आपण संतुलित आहार आणि त्याचे योग्य प्रमाण याचा मेळ साधत नाही. हॉटेल्समध्ये मागवलेल्या पदार्थांचे प्रमाण आपल्या गरजेपेक्षा खूपच जास्त असते. अशावेळी तुमच्या बरोबर जेवायला एखाद्या सहकार्‍याला / मित्राला घेऊन जा. किंवा सगळे संपवण्याच्या फंदात न पडता गरजेपुरते खाऊन बाकीचे पॅक करून घ्या. तुमचे जेवण संतुलित करण्यासाठी निदान ४ अन्नगटातले पदार्थ मागवा. तुमचे निम्मे ताट भरून सॅलड आणि भाज्या, एक चतुर्थांश ताट भरून सालासकट धान्यांचे पदार्थ आणि उरलेले एक चतुर्थांश ताट भरून प्रथिनयुक्त पदार्थ (डाळी व कडधान्ये / मांसाहारी पदार्थ) घ्या. साखर घातलेली पेये,तळलेले तोंडी लावण्याचे पदार्थ / स्टार्टर्स आणि स्वीट डिशेस टाळा.

प्रवासातले खाणे
एका जागी बसून शांत चित्ताने खाणे जरी आरोग्याच्या दृष्टीने चांगले असले तरी बर्‍याचदा कामाच्या गडबडीत एका जागी बसून खायला वेळ मिळत नाही. अशावेळी जाता-येता रस्त्यावरचे फास्ट फूड/ जंक फूड (बटाटे वडा, समोसे, चिप्स इ.) विकत घेऊन ते पटकन खाण्याकडे आपला कल असतो. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे अशावेळीही आपण आरोग्यदायी पर्याय निवडू शकतो. उदा. पनीर / चिकन / मासा घालून केलेले सॅंडविच, इडली-सांबार, उकडलेली मोडाची कडधान्ये, सुकामेवा, फळे, दही/ ताक, ग्रॅनोला, भाज्या व अंड्याचे रोल्स इ. जेव्हा घरून डबा घेऊन येणे शक्य नसेल तेव्हा बाजारात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी बार हाही चांगला पर्याय ठरू शकतो. घराबाहेर पडताना काही खाऊन निघणे (शक्यतो प्रथिनयुक्त पदार्थ) हे देखील महत्वाचे आहे. यामुळे पोट भरलेले राहून सारखी भूक लागणार नाही व चुकीचे खाणे टळेल.

१. कुठे खायचे, किती खायचे आणि कधी खायचे हे सर्व तुमच्या हातात आहे.
२. बाहेर खाताना तुमच्या खाण्याच्या नियमित वेळांचे पालन करा.
३. कडकडीत उपवास करणे आणि अतिरिक्त खाणे – दोन्ही टाळा. मधुमेह असणार्‍यांनी याची विशेष काळजी घ्या.
४. तुम्ही काय मागवताय आणि कुठून मागवताय याकडे लक्ष ठेवा.
५. बाहेर खाताना खाण्याचे प्रमाण कमी ठेवा.एक खाणे दोन वेळेला विभागून खा.

६. बाहेर खाण्याचे आधी नियोजन करा.आयत्या वेळी ठरवायला गेलात, तर गोंधळ होऊ शकतो. हॉटेलात गेल्यावर पूर्ण मेनूकार्ड वाचायचे टाळा!
७. घरातून बाहेर पडण्यापूर्वी प्रथिनयुक्त नाश्ता करा.
८. बाहेर खाताना व इतरवेळी सुद्धा तुमच्या जेवणात सगळ्या अन्नगटांमधील पदार्थ असतील याची काळजी घ्या.
९. एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असेल किंवा काही त्रास होत असेल तर तो पदार्थ खाणे टाळा.
१०. सॉस, ड्रेसिंग्स खाद्यपदार्थात घालून मागवण्यापेक्षा वेगळे मागवा आणि गरजेपुरतेच वापरा.

बाहेर खाताना घ्यायची काळजी,शिजवायच्या पद्धती, पदार्थांची निवड हे सगळे व्यवस्थित समजले आहे?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.