बालकांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यास होणारा उशीर (भाग २)

डॉ. मानसी पाटील  
डॉक्‍टर्स आणि नर्सेस वाढीविषयक पूर्वतपासण्या वापरून बालके योग्य वेळेत योग्य गोष्टी शिकत आहेत की याबाबत अंदाज बांधू शकतात. यात पालकांशी चर्चा करून त्यांची मते विचारणे, बालकांच्या वागणुकीचे, लकबींचे, हालचालींचे, बोलण्याचे निरीक्षण करणे या पद्धतींचा समावेश होतो. 
आईमधील कारणे:
आईमधील खालील कारणे बालकातील वाढीचे टप्पे गाठण्यामधील अडथळे ठरू शकतात. खालील कारणे असणाऱ्या सर्वच आयांच्या बाळांमध्ये अडचणी दिसत नाहीत, पण त्या येण्याची शक्‍यता मात्र जास्त असते. खालील कारणे नसतानादेखील काही आयांच्या मुलांमध्ये वाढीबाबत अडचणी असू शकतात.
1) आईचे शिक्षण 12 वी पेक्षा कमी असणे
2) गरोदरपणातील योग्य काळजी तिसऱ्या महिन्यानंतर घेणे
3) गरोदरपणात तंबाखूचे सेवन करणे
4) गरोदरपणात मद्यप्राशन करणे
5) काही वैद्यकीय कारणे (रक्तक्षय, अपुरा आहार, जंतूसंसर्ग, मधुमेह, उच्चरक्तदाब)
6) गरोदरपणात अथवा प्रसूतिदरम्यान काही गुंतागुंत होणे
बाळामधील कारणे: बाळामधील खालील कारणे त्याच्या वाढीचे टप्पे गाठण्यामधील अडथळे ठरू शकतात. खालील कारणे असणाऱ्या सर्वच बाळांमध्ये अडचणी दिसत नाहीत, पण त्या येण्याची शक्‍यता मात्र जास्त असते. खालील कारणे नसतानादेखील काही बाळांमध्ये वाढीबाबत अडचणी असू शकतात.
1) 37 आठवडे पूर्ण होण्याआधी जन्माला येणे
2) जन्मतः वजन 2500 ग्रॅमपेक्षा कमी असणे
3) स्कोअर (जन्मानंतर 5 मिनिटांनी) 7 पेक्षा कमी असणे (हा स्कोअर 0 ते 10 पर्यंत असून तो बाळाची शारीरिक
4) परिस्थिती तपासण्यासाठी काढला जातो.)
5) जुळ्या अथवा तिळ्यांचा जन्म होणे
6) बाळात जन्मजात व्यंग असणे
7) बाळातील काही वैद्यकीय कारणे (रक्तक्षय)
8) बालकांची उशिराने होणारी वाढ ही इतर काही आजारांचे लक्षण असू शकते. उदा-
9) स्वमग्नता किंवा सेरेब्रल पाल्सी
10) फिटल अल्कोहोल स्पेक्‍ट्रम डिसॉर्डर
11) मायोपॅथी, मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी
12) डाऊन सिन्ड्रोम सारखे काही अनुवंशिक आजार
बाळाची वाढ योग्य गतीने होत नाही अशी जर तुम्हाला शंका आली तर- 
प्रत्येक मुलाचा वाढीचा वेग एकसारखा नसतो. त्यामुळे याचे निदान अतिशय काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावे लागते. कोणत्या प्रकारच्या वाढीचा दोष आहे त्यानुसार उपचारपद्धती बदलते. मेंदूच्या क्षमतांमधील सुधारणांसाठी वेगळे व्यायाम व उपचार असतात तर स्वमग्नता (सारख्या आजारांमध्ये स्वभाव व शिक्षणविषयक उपचार द्यावे लागतात. काही वेळा काही औषधांची मदत घ्यावी लागते. त्या त्या विषयातले तज्ज्ञ याविषयी अचूक उपचारपद्धती सुचवतात.
वाढीतील उशिराचे निदान करणे जरी अवघड असले तरी त्यासाठी विविध पद्धती आहेत. यात 2 प्रकार आहेत – वाढीविषयक पूर्वतपासण्या आणि वाढीविषयक मूल्यमापन. याबाबतीतले निदान करण्यासाठी कोणत्याही रक्ततपासण्या नसल्यामुळे वरील पूर्वतपासण्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. जर या पूर्वतपासण्यांनुसार असे लक्षात आले की बाळाच्या वाढीचा वेग योग्य तितका नाही, तर वाढीविषयक मूल्यमापन करावे लागते. वाढीविषयक मूल्यमापनामध्ये विविध तज्ज्ञांकडून बालकाच्या विविध कौशल्यांचा सखोल अभ्यास केला जातो. याच्या निष्कर्षांनुसार गरज पडल्यास पुढील काही तपासण्या व उपचार सुचवले जातात. एखाद्या बाबतीतच अडथळा जाणवल्यास त्या विषयातील तज्ञ त्याबाबत उपाययोजना करतात.
वाढीतील अडथळ्यांचे निदान व भविष्य 
वाढीमध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा आहे, किती प्रमाणात आहे आणि बाळापुढील आव्हाने कोणत्या प्रकारची आहेत यानुसार या बालकांची भविष्यातील प्रगतीचा अंदाज बांधता येतो. निदान लवकर झाल्याने व वेळेत उपचार घेतल्याने बालकाची प्रगती चांगली होऊ शकते. परिस्थिती पूर्वपदाला येणे जरी अवघड असले किंवा प्रगतीचा वेग जरी अतिशय कमी असला तरी बरीच मुले योग्य उपाययोजनेने काही काळात आपल्या समवयस्कांच्या बरोबरीने प्रगती करायला लागतात. काहींमध्ये मात्र प्रौढ वयात देखील काही अडचणी आणि अडथळे दिसू शकतात. अनेकजण दैनंदिन कार्यात स्वयंपूर्ण होतात तर काहींना सामाजिक व वैयक्तिक आधाराचीही गरज भासू शकते. क्वचित काहींमध्ये वाढीतील दोष बळावतात आणि मज्जासंस्थेस इजा पोहोचू शकते. अशांना जास्त मदतीची गरज भासते.
निष्कर्ष
बालकांच्या वाढीमध्ये अनेक अनुवंशिक व पर्यावरणीय घटकांचा हातभार असतो. यातील काही दोषांमुळे बालकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. काहीवेळा निरोगी आईवडील असताना, प्रसूतिदरम्यान योग्य काळजी घेतली असताना देखील बालकाच्या वाढीत काही दोष येऊ शकतात. वाढीतील दोषांचे नेमके कारण सांगणे जरी अवघड असले तरी आता यासाठी अनेक प्रभावी उपचारपद्धती अस्तित्वात आहेत. वाढीतील दोषांचे जेवढे लवकर निदान होईल, तितकी बालकाची प्रौढ वयात चांगली प्रगती होण्यास हातभार लागेल!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)