बालकांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यास होणारा उशीर (भाग १)

डॉ. मानसी पाटील  
डॉक्‍टर्स आणि नर्सेस वाढीविषयक पूर्वतपासण्या वापरून बालके योग्य वेळेत योग्य गोष्टी शिकत आहेत की याबाबत अंदाज बांधू शकतात. यात पालकांशी चर्चा करून त्यांची मते विचारणे, बालकांच्या वागणुकीचे, लकबींचे, हालचालींचे, बोलण्याचे निरीक्षण करणे या पद्धतींचा समावेश होतो. 
बालकांची वाढ आणि विकास यामध्ये वयानुसार बदलणाऱ्या अनेक क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिसादांचा समावेश होतो. बालके त्यांच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे त्यांच्या-त्यांच्या वेगाने गाठत असतात. वेगवेगळ्या बालकांमध्ये या वेगात बरीच तफावत असू शकते जी अगदी नॉर्मल समजली जाते. एखादा वाढीचा टप्पा गाठण्यास झालेला तात्पुरता उशीर हे फार काळजीचे कारण नसते. पण जर प्रत्येक वाढीचा टप्पा गाठायला उशीर होऊ लागला तर मात्र यात लक्ष घालावे लागते.
वाढीचे टप्पे गाठण्यात झालेला उशीर पुढील आयुष्यावर देखील सौम्य अथवा तीव्र स्वरूपाचे परिणाम घडवू शकतो. यात मुख्यत्वे बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, विचार करण्यामध्ये आणि मेंदूच्या काही क्षमता गाठण्यामध्ये येणारे अडथळे विचारात घेतले जातात. वाढीचे टप्पे गाठण्यात होणाऱ्या उशिरामागे अनेक कारणे असू शकतात – अनुवंशिकता, गरोदरपणातील काही अडचणी, वेळेआधी प्रसूती होणे (कमी दिवसाच्या बालकाचा जन्म) इ. पण बऱ्याचदा काही ठराविक कारण सापडेलच असे नाही. यामागे शरीरातील अतिशय क्‍लिष्ट घडामोडींचा हात असतो. पण या अडचणी लक्षात येताच त्यावर तत्काळ उपययोजना करणे, वाढीचे टप्पे गाठता यावेत म्हणून आणि बालकाने प्रौढावस्थेत योग्य प्रगती करत वाटचाल करावी म्हणून वेळीच पावले उचलणे महत्वाचे ठरते.
प्रत्येक बालकाने वाढीचे टप्पे गाठायची वेळ वेगवेगळी असली तरी ते गाठण्याची एक विशिष्ट कालमर्यादा असते. मेंदूच्या सूक्ष्म आणि स्थूल क्षमता गाठण्यात उशीर होणे, सूक्ष्म क्षमता म्हणजे वेगवेगळ्या क्रियांसाठी हाताच्या बोटांचा वापर करता येऊन लहान-सहान हालचाली करणे (उदा. हातात खडू अथवा खेळणे पकडणे). स्थूल क्षमता म्हणजे त्यामानाने मोठ्या प्रकारच्या हालचाली (उदा. उड्या मारणे, जिना चढणे, चेंडू फेकणे इ.).
बालकांची प्रगती वेगवेगळ्या वेगाने होत असली तरी सर्वसाधारणपणे तिसऱ्या महिन्यात बाळ मान धरायला सुरुवात करतात, सहाव्या महिन्यात बसतात, आणि दुसऱ्या वाढदिवसाच्या आधी चालायला लागतात. पाचव्या वर्षांपर्यंत मुले हवेत उंच बॉल फेकायला शिकतात आणि आधारासाठीची चाके लावून सायकल चालवू शकतात. खालील काही लक्षणे बालकाची उशिराने होणारी वाढ आणि विकासाचे टप्पे गाठायला होणारा उशीर दर्शवू शकतात-
1) धड आणि अवयव लुळे पडणे
2) हाता-पायात ताठरता येणे
3) हाता-पायाच्या मर्यादित हालचाली
4) 9 व्या महिन्यापर्यंत आधाराशिवाय बसता न येणे
5) ऐच्छिक हालचालींपेक्षा अनैच्छिक हालचालींचे वर्चस्व
6) एक वर्षापर्यंत आधार घेऊनसुद्धा पायावर वजन घेऊन उभे रहाता न येणे
बऱ्याचदा या कालमर्यादेपेक्षा होणारा उशीर सर्वसामान्य असू शकतो, पण अशावेळी एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून खात्री करून घेणे आवश्‍यक असते.
बोलणे व भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यास होणारा उशीर – 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन डेफनेस ऍण्ड अदर कम्युनिकेशन डिसॉर्डरनुसार, आपला मेंदू वयाच्या पहिल्या 3 वर्षांपर्यंत सर्वाधिक सक्रिय आणि ग्रहणक्षम असतो. या काळात मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे हा काळ बोलणे व भाषा शिकण्यासाठी सर्वोत्तम असतो. खरंतर बाळाच्या संवादाची सुरुवात जन्मतःच होते उदा. भूक लागली की रडणे. सहा महिन्याचे होईपर्यंत बाळे नेहमीच्या बोलीभाषेतील अनेक आवाज ओळखायला शिकतात. 12 ते 15 महिन्यांपर्यंत साधे सोप्पे शब्द अस्पष्टपणे का होईना, पण बोलायला शिकतात. 18 महियापर्यंत त्यांना काही शब्दांचे अर्थ कळू लागतात. 3 वर्षांचे होईपर्यंत मुलांना छोटी छोटी वाक्‍ये बोलायला येतात. बोलणे आणि भाषिक कौशल्यातील उशीर हा वेगवेगळ्या कारणांमुळे होतो-
बोलण्यासाठी स्वरयंत्र, जीभ, ओठ आणि जबडा यातील स्नायूंच्या हालचालींची सुसूत्रता लागते. अशा प्रकारे आवाज बाहेर काढण्यात येणारे अडथळे हे बोलण्यातील उशिरासाठी कारण ठरू शकतात. बोलण्यासंबंधी काही विकारांमध्ये (aréia of reebh) मुलांना अक्षरे एकत्र जोडून त्याचे शब्द बनविण्यात अडचणी येतात. याउलट भाषिक कौशल्ये गाठण्यास होणारा उशीर हा समोरच्याचे बोलणे कळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे होऊ शकतो. अशी मुले आपले म्हणणे मांडण्यातही कमी पडतात. यात एखादी खूण करणे, हावभाव करणे आणि लिहिण्याचाही समावेश होऊ शकतो.
ऐकण्यातील अडथळे देखील बोलणे व भाषेतील अडचणींसाठी कारण ठरू शकतात. कानांची श्रवणचाचणी करून हे पडताळून पहाता येते. बोलणे व भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यास जर उशीर होत असेल तर यातील तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्यावा. वेळेत घेतलेले उपचार काही अडथळे दूर करण्यास मदत करू शकतात.
वाढीचे टप्पे गाठण्यास होणारा उशीर : कारणे व धोक्‍याचे घटक 
सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शननुसार 3 ते 17 वर्षांमधील जवळपास 15% मुलांमध्ये वाढीचे टप्पे गाठण्यात एका बाबतीत तरी उशीर झालेला दिसून येतो. अनेकदा हे अडथळे जन्मापूर्वीच घडतात पण काही वेळा जन्मानंतरही जंतूसंसर्गामुळे, दुखापतीमुळे अथवा इतर काही कारणांमुळे घडू शकतात. अनेक घटक यास हातभार लावत असल्याने याचे एखादे विशिष्ट कारण सांगणे अवघड आहे. असे असले तरी काही जनुकीय आजार (डाऊन सिन्ड्रोम), गरोदरपण व बालवयातील जंतुसंसर्ग आणि वेळेआधी(कमी वयाचे) बाळ जन्माला येणे ही यामागची महत्त्वाची कारणे समजली जातात. ही कारणे “आईमधील कारणे’ आणि “बालकांमधील कारणे’ अशा दोन प्रकारांमध्ये विभागता येतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)