बारावीच्या भाषा विषयाला यंदापासून कृतिपत्रिका

संग्रहित फोटो

कल्पनाशक्‍तीचा वापर देता येणार उत्तरे
– राज्य मंडळाचा निर्णय : नववी ते बारावीसाठी निर्णय

पुणे – घोकमपट्टीची पारंपरिक पध्दत बंद करून जास्तीत जास्त कल्पनाशक्‍तीचा वापर करत प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाने यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीच्या प्रथम भाषा विषयासाठी कृतिपत्रिका जाहीर केली आहे. शैक्षणिक वर्ष 2015-16 ला इयत्ता नववीला कृतिपत्रिका लागू झाली त्यानंतर दहावी, अकरावी व आता यंदा बारावीलाही सुरू होणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागील शैक्षणिक वर्षात (2015-16) घेतलेल्या निर्णयाप्रमाणे इयत्ता नववी, दहावी तसेच अकरावी बारावीचा अभ्यास अधिकाधिक कृतिशील करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे मागील तीन वर्षांपासून कृतिपत्रिकेचा निर्णय टप्प्याटप्याने लागू केला जात आहे.
या कृतिपत्रिकेनुसार विद्यार्थ्यांनी केवळ पत्र व उत्तर या स्वरुपात अभ्यास न करता आकलन, चिंतन, अभिव्यक्‍त होणे, चिंतन करणे आदी गोष्टी कराव्यात यासाठी प्रश्‍नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून सुरू आहे. मात्र पाठ्यपुस्तकात कोणताही बदल करण्यात आलेला नसून केवळ प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप बदलण्यात आले असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. हा बदल 80 गुणांच्या लेखी परीक्षेत केलेला असून तोंडी परीक्षेचे 20 गुणांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या वर्षीपासून मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगु, सिंधी या नऊ भाषा विषयांना कृतिपत्रिकेप्रमाणे मुल्यमापन योजना लागू झाली आहे. यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचेही त्या-त्या विभागीय बोर्डाकडून आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घोकमपट्टी बंद..
प्रचलित प्रश्‍नपत्रिका स्वरुपात कोण कोणास म्हणाले, गाळलेल्या जागा भरा.. उतारा वाचून प्रश्‍नांची उत्तरे द्या.. आदी गोष्टी आता बंद होणार असून संवाद लेखन, जाहिरात लेखन, कथालेखन, शब्दकोड्यांच्या वापर करत विद्यार्थ्यांसाठीची प्रश्‍नपत्रिका अर्थात कृतिपत्रिका तयार केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी घोकमपट्टी करण्याऐवजी अधिकाधिक सृजनात्मकरित्या तसेच कल्पनाशक्‍तीला वाव देत अधिकाधिक चांगल्या पध्दतीने भाषेचा अभ्यास करावा यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)