बारामती पोलिसांना मोक्‍काचा “धोका’

जळोची -बारामती शहर पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांत तब्बल 31 गुन्हेगारांवर तर उपविभागात 39 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर पोलीसांचा वचक वाढला असल्याचे मानले जात होते. परंतु, शहरात खुनाचे सत्र सुरूच असून चार दिवसांत महिलांवरील खुनी हल्ले वाढले आहेत. यामुळे मोका कारवाईचा कुठलाच इफेक्‍ट गुन्हेगारी कमी होण्यावर झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून यावर्षी पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने मोका कारवाईद्वारे शहर तसेच परिसरातील मोठ्या गुंडांवर कारवाई केली. मोकाच्या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात होते. त्याही पुढे जावून शहर परिसरातील आणखी काही गुंडांची नावे मोकाच्या यादीत टाकण्यात येवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे सुतोवाच बारामती पोलिसांकडून करण्यात आले होते. परंतु, ही कारवाई सुरू असतानाच गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील सुरक्षितताच धोक्‍यात आली आहे.

बारामती शहरात गेल्यावर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या मटका किंग जाधव याच्या खुनानतंर खुनाच्या घटनेशी संबंधित एका अल्पवयीन तरुणीचा धारधार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच अवघ्या चार दिवसांच्या अंतरावर शहरातील वर्दळीच्या व लोकवस्तीच्या (शेळकेवस्ती, तांदूळवाडी) ठिकाणी लोंखडी सत्तुराने वार करुन एका महिलेवर खुनी हल्ला करण्यात आला. शहरातील खाटीक गल्लीत लहान मुलांत खेळण्यावरुन वाद झाला होता. हा वाद मिटवण्यात आला होता. सदर वादाचा राग मनात धरुन अरबाज (अब्बू) अल्ताफ कुरेशी (रा. खाटीक गल्ली) याने फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीच्या मुलीच्या मानेवर, हातावर, तोंडावर वार करुन गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद हसीना गुलाब कुरेशी (रा. खाटीक गल्ली, सध्या रा, शेळकेवस्ती तांदुळवाडी) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असले तरी अशा घटनांमुळे बारामती शहरातील महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बारामती शहरातील सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरीताच मोका कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही गुन्हेगारांवरही कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.