कारचा पाठलाग करीत दोघांना पकडले : एक फारार
बारामती- खासगी चारचाकी वाहनाचा पाठलाग करून बारामती शहर पोलिसांनी पिस्तूल व तलवार तसेच चारचाकी वाहनसह एकूण 5 लाख 64 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला. ही घटना सोमवारी (दि. 22) घडली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आला असून चारचाकी वाहनाचा चालक मात्र फरार झाला आहे.
राजेंद्र रामचंद्र सल्ले (वय 46, रा. खोरोची, ता. इंदापूर), मनोहर पोपट काळभोर (वय 40 रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पप्पू राजेंद्र सल्ले (रा. खोरोची ता. इंदापूर) हा गाडीचाचालक फरार आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातून निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी शस्त्रास्त्रे घेऊन जात असल्याची खबर शहर पोलीस ठाण्यात मिळाली होती .त्यानुसार पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार बारामती इंदापूर रस्त्यावरील लिमटेक येथे नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी जात असताना इशारा करीत पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी भरधाव वेगात निघून गेली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह खासगी वाहनाने गाडीचा पाठलाग केला. अखेर खोरोची येथे निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी पकडण्यात पोलिसांना यश आल.
गाडीची झडती घेतली असत एक पिस्तूल (अग्नि शस्त्र) व एक लोखंडी तलवार, सुझुकी कंपनीची निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी, दोन मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर फरार असलेल्या सल्लेवर वालचंदनगर तसेच इंदापूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास फौजदार संदीपन माळी करीत आहेत.