बारामती तालुक्‍याचे “पॅटर्न’

मतदारसंघात विरोधकांकडून सर्वेक्षण; वास्तव स्थिती समोर

बारामती- बारामती तालुक्‍याच्या विकासाच्या पॅटर्नची चर्चा सर्वत्र होत असताना मुळातच या तालुक्‍याचे दोन पॅटर्न असल्याचे चित्र विरोधकांकडून समोर मांडले जात आहे. बारामती शहरात विकास आणि तालुक्‍यात भकास असे पॅटर्न विरोधी पक्षाकडून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.13) येथे होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच दोन पॅटर्नवर बोलणार असल्याचे सांगितले जात आहे.

बारामती लोकसभेच्या पार्श्‍वभुमीवर भाजपकडून या मतदारसंघाचे सर्वेक्षण विविध पातळीवर करण्यात आले आहे. त्यातही बारामती शहर आणि तालुक्‍याच्या स्थितीचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला असून बारामतीत जो काही विकासचा पॅटर्न दाखविला जातो अगदी त्याच्या उलट भकास स्थितीचा पॅटर्न निम्या तालुक्‍यात असल्याचे वास्तव या सर्वेक्षणातून मांडण्यात आले आहे. बारामती शहर तसेच लगतच्या परिसरात राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बॅंका, शोरुम असे विकासात्मक दृश्‍य असताना अवघ्या आठ, दहा कि.मी. अंतरावर मात्र हा पॅटर्न बदलल्याचे निदर्शनास येत आहे. अगदी शहराच्या जवळ असलेल्या जिरायती पट्ट्यातील गावांत गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळी स्थिती कायम आहे. यातूनच निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई या गावाच्या मुळावर उठली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिरायती गावांत गेल्या दोन वर्षात पीक आलेले नाही. शेतीबंद असल्याने गावातही रोजगार नाहीत, त्यामुळे अनेक तरूण सुशिक्षित मुले-मुलींनी गाव सोडून शहरांकडे धाव घेतली आहे.

बारामती शहरलगत असलेल्या माळेगाव, सोमेश्वर, निंबूत, वडगाव निंबाळकर अशा काही मोजक्‍या गावांमध्ये हिरवीगार शेती आहे. नऊ, दहा महिने तुडुंब भरून वाहणारे कालवे याच भागातून जातात. याच गाव परिसरात मोठे उद्योग, व्यवसायातून सुबत्ता आहे. बारामतीतल्या औद्योगिक वसाहतीत मोठ मोठ्या कंपन्या, टेक्‍सटाईल पार्क यातून रोजगार उपलब्ध झाला असल्याने या भागाचा विकास झाला आहे. रेस्टॉरंट, टु स्टार, थ्री स्टार हॉटेलस अशी हॉटेल याच भागात आहेत, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था, उच्च शिक्षणाच्या संधी यामुळे शहरा बाहेरून येणाऱ्यांना बारामती शहराची भुरळ पडते. तर, जिरायती पट्ट्यातील अंजनगाव, जळगाव-सुपे, कऱ्हाटी, तरडोली, पवारवाडी, बाबुर्डी यासह अन्य 22 गावांत पिण्यासाठीही पाणी नाही आणि ही स्थिती पिढ्यानं पिढ्या या गावांनी पाहली आहे. दुष्काळाचा भकास पॅटर्न दिसतो तो याच गावात.

  • पाणीदार गावे आणि पाण्याचा धंदा…
    नीरा-डाव्या कालव्यामुळे बारामती शहराहस माळेगाव, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर आणि लगतच्या काही गावांत “लक्ष्मी पाणी भरते’. विशेष म्हणजे पाणीदार म्हणून ओळख असलेल्या याच भागातील गावातून शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे प्लॅंटचा धंदा उघडून हेच पाणी तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त गावांत विकले जाते. दुष्काळी पट्ट्यात पाणीच नसल्याने याच भागात पाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. एकाच तालुक्‍यात अशा पद्धतीने दोन चित्र दिसतात.
  • पवार कुटुंबामुळेच बारामती…
    बारामती शहराचा विकास पवार कुटुंबामुळे झाला, असा सांगणारा वर्ग आपल्याला तालुक्‍याच्या सधन भागात दिसतो. पाणीदार गावात पवार नावाला मोठे वजन आहे. काही प्रस्थापित घराणी जपल्याने अशा भागात त्यांची ताकद मोठी दिसते. तर, बारामती शहराबाहेर विशेषत: जिरायती पट्ट्यात मात्र झालेल्या कामांबाबत नाराजी दिसून येते. बारामती शहराचा जसा विकास झाला तसा आमच्या गावाचा का नाही? असा सवालही बहुतांशी वेळा केला गेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.