बारामती आगाराचे 28 लाखांचे नुकसान

  • सलग दुसऱ्या दिवशी बसेस बंद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका

बारामती – बारामती बसस्थानकातील बसेस आज (बुधवारी) सलग दुसऱ्या दिवशीही आगाराबाहेर सोडण्यात आलेल्या नाहीत. सकाळी नऊ वाजेपर्यंत भिगवण, वालचंदनगर, जेजुरी, फलटण, नीरा, या शटल मार्गावेरील बसेस थोड्या प्रमाणात सोडण्यात आल्या होत्या मात्र, वडगाव निंबाळकर, व काऱ्हाटी या ठिकाणी रस्तारोको केल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा सर्व बसेस बंद करण्यात आल्या. तर मंगळवार (दि. 24) पासून लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे बारामती बस आगाराचे दोन दिवसांत 28 लाख रुपयांचे उत्पान्न बुडाले आहे.
बारामती आगार हा राज्यात तालुका पातळीवर सर्वात जास्त उत्पन्ना देणारा आगार आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या हिंसक आंदोलनामुळे बारामती बस आगाराच्या दोन बसेसचे नुकसान झाले असून इंदापूर आगाराच्या एका बसचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बारामतीपासून पाच किमी अंतरावरील पिंपळी येथे वालचंदनगर-बारामती या बसच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, बारामती बस आगारात दिवसभरात 150 फेऱ्या होतात. मात्र, आज सलग दुसऱ्या दिवशीच्या बस बंदमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले. विशेषत: लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूपच अडचण झाली. आजही बसस्थानकात शुकशुकाट दिसत होता. बसचालक व वाहक दैनंदिन कामावर आले होते; परंतु बस बंद असल्यामुळे जागोजागी बसून चर्चा करताना दिसत होते.
सलग दुसऱ्या दिवशी बसेस बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांची व नोकरदारांचे चांगलेच हाल झाले आहे. या बंदचा फायदा घेवून खासगी वाहतूकदारांनी चांगलाच लाभ घेतला. जवळपास आज दीडपट भाडे आकारणी करुन प्रवासी वाहतूक केली जात होती. बारामती बसस्थानकाला या खासगी प्रवासी वाहतुकदारांनी जवळपास विळखाच टाकला आहे. तरीही प्रवाशांना लवकर वाहन मिळत नव्हते बसस्थानकाच्या परिसरात रिक्षावाल्यांनीही चांगलीच कमाई करुन घेतली. आज दुसऱ्या दिवशी बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू होती मात्र, ग्राहकांची गर्दी कमीच होती.
चौकट : कोणत्याही आंदोलनात एसटीचाच बळी
कोणतेही आंदोलन असो नुकसान फक्‍त एसटीचेच होते, याबाबत सरकार कोणताही कडक कायदा करीत नाही, त्याचप्रमाणे एसटी बसचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत; परंतु त्याकडे सोयीस्कर हितसंबंध आणि राजकारण यांच्या गर्तेत आद्यापर्यंत कोणतीही नुकसान भरपाई एसटीला मिळाले नाही, अशी चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

बारामती बस स्थानकातील दोन बसेसचे नुकसान झाले आहे. बरमतीकडे येत असताना इंदापूर डेपोच्या एका बसचे देखील नुकसान झाले आहे .बारामती अगराचे दिवसाचे उत्पन्न 14 लाख आहे. मंगळवारी आणि आज फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांचे तर हाल झालेत मात्र, एसटीचे ही नुकसान झाले आहे.
– अमोल गोंजारी, आगरवस्थापक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)