बारामतीत सामाजिक संस्थेची जागा प्रांत विभागाने बळकावली ?

बारामती- बारामती येथील जनहित प्रतिष्ठन या सामाजिक संस्थेच्या जागेवर चक्‍क प्रांत विभागानेच अतिक्रमण केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या संस्थेने बारामती उपविभागीय अधिकारी बारामती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंतांना सविस्तर पत्र लिहून कळविले आहे.

या जागेचे कागदपत्रे तपासण्याचे तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. जागेची पाहणी व कागदपत्रे तपासून आम्ही याबाबतचा निर्णय घेणार आहोत.
-हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी

मात्र प्रांत कार्यालयाने संबंधित संस्थेला कोणतीही पूर्व कल्पना न देता किंव जागेची शहानिशा न करता संस्थेच्या जागेत सॅनिटरी टॅंक बांधण्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे प्रांत कार्यालयाच्या कार्यशैलीवर लोकांमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

बारामती शहरातील गट क्रमांक व उपविभाग 16/2/ प्लॉट नं 74 व भूधारणा पद्धती, भोगवटादार वर्ग 1 च्या नुसार जनहित प्रतिष्ठान बारामती व विश्‍वस्त संस्था अध्यक्ष किशोर कमलाकर कानिटकर यांच्या नावे बिनशेती असलेला 3400 चौरस मीटर असा प्लॉट आहे. याच प्लॉटवर प्रांत कार्यालयाने सरळ सरळ अतिक्रमण केले असून या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता. सार्वजनिक सॅनिटरी टॅंकचे काम सुरू केले आहे.

त्यामुळे प्रांत कार्यालयच जर अतिक्रमण करावयास लागले, तर सर्वसामान्यांनी न्याय तरी कोणाला मागायचा? असा प्रश्‍न बारामतीकरांसमोर उभा राहिला आहे. याबाबत जनहित प्रतिष्ठानने प्रांत कार्यालयास पत्र लिहून याबाबतची विचारणा केली असता, कोणतेही उत्तर अद्याप त्यांना आलेले नाही.

बारामती येथील गट क्र. 16 प्लॉट क्र 74 आमच्या संस्थेच्या मालकीचा प्लॉट असून तशी सातबारावर नोंद आहे. तसेच आमच्या संस्थेच्या प्रॉपर्टी कार्डला धर्मादाय आयुक्‍त पुणे यांच्याकडेही नोंद आहे. या जागेत संस्थेने सार्वजनिक क्रिडांगण (मुला-मूलींसाठी) सूरू केले असून त्यावर परिसरातील मुले व मुली त्याचा लाभ घेत आहेत. संस्थेला कोणतीही पूर्व सूचना न देता आपण त्या जागेवर सॅनिटरी टॅंक बांधण्याचे काम योजिले आहे. तरी त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे टॉयलेट, टॅंक बांधण्यास आमची तीव्र हरकत असून आपण संस्थेच्या आणि धर्मादाय आयुक्‍त यांच्या परवानगी शिवाय कोणतेही काम करू नये, असे स्पष्ट पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

याबाबत भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अविनाश मोटे म्हणाले की, आम्ही प्रांतांना याबाबत संपर्क साधून विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच आम्ही आमचे बघून घेवू अशा प्रकारची उत्तरे देण्यात आली. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनाही नंतर कळविण्यात येईल, याचा विचार करीत आहोत, अशा प्रकारे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)