बारामतीत विद्यार्थ्यांची ससेहोलपट

शैक्षणिक कागदपत्रे मिळण्यास दिरंगाई : अभाविपचा आंदोलनाचा इशारा

बारामती – बारामतीत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे देण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे, त्यामुळे प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. कागदपत्रे वेळेत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, याबाबतचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना अभाविपच्या वतीने बुधवारी (दि. 19) देण्यात आले.

बारामती तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश प्रक्रियेसाठी वेळेत दाखले देण्यात यावे अन्यथा बारामती तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा अभाविपच्या वतीने देण्यात आला आहे. अभियांत्रकी, औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीय व्यवस्थापन, कृषी, इतर विद्या शाखांतील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांची आवश्‍यकता असते.

बारामती तालुक्‍यातील बहुतांशी भाग ग्रामीण व दुर्गम असल्याने या भागातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्रे मिळण्यासाठी महासुविधा केंद्र व तहसील कचेरीतील वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. दखले वितरित करण्यासाठी शासनाने विहित मुदत देखील ठरवून दिली आहे. मात्र, याचे पालन प्रशासनाकडून केले जात नाही. सुविधा केंद्रतील विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज केंद्र चालकांकडून वेळेत संगणकावर अपलोड न केल्याने तसेच दखले मंजूर करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून विलंब होत असल्यामुळे बारामती तालुक्‍यातील शेकडो विद्यार्थी विविध शाखांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. प्रांत अधिकारी व तहसीलदारांना विद्यार्थ्यांची काहीच पर्वा नाही असे शहरमंत्री वैभव सोलनकर म्हणाले. जर दोन दिवसांत यावर तोडगा न काढल्यास विद्यार्थी परिषद आंदोलन करेल, असा इशारा तहसीलदारांना यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना शहरमंत्री वैभव सोलनकर, अक्षय मोरे, दादासाहेब मेरगळ, शशिकांत टिंगरे, सचिन गाडे, विश्‍वजीत लोंढे, संदेश सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.