बारामतीत किरकोळ आघाडीवरच विजय

सुळे आणि कांचन यांच्याही विजयाचा दावा; मतपेटीतून कोणाच्या विरोधात असणार जनतेचा कौल

जिल्हा प्रतिनिधी

पुणे, दि. 20 – बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजयाचे दावे केले जात आहेत. गुरूवारी (दि.23) हे स्पष्ट होणार असले तरी मतदारांच्या औत्सुक्‍यापोटी घेण्यात आलेल्या आढाव्यातून या मतदार संघातील पूर्व अंदाजीत निकाल विचार करायला भाग पाडणारा आहे.

या दोन्ही उमेदवारात विजयी होणाऱ्यांत विजयी मतांमध्ये फारसे अंतर नसणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना 2014मध्ये विजयासाठी झगडावे लागले होते. त्याही पेक्षा यावेळी त्यांना मोठे आव्हान भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी दिल्याचे मतदानाच्या अंदाजीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सुळे यांनी गेल्यावेळी निसटता विजय मिळवला होता, याही वेळी कमी-अधिक मतांनी त्यांचाच विजय होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, बारामती मतदारसंघात पारंपरीक मतदारांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली असल्याचेही सांगितले जात असून याच कारणातून यावेळी सुळे यांचे लाखोंचे मताधिक्‍य घटले असल्याचा दावा भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे समर्थक करीत आहेत. 2014चा अंदाज घेता बदल म्हणून मतदारांनी रासपचे महादेव जानकर यांना दमदार पसंती दिली होती, त्याच पार्श्‍वभुमीवर मतदारांनी यंदा कांचन कुल यांच्या पारडात मतं टाकली असल्याचा दावा केले जात आहे. गेल्यावेळी केवळ बारामती विधानसभेच्या मतदारांनी तारल्यानेच सुळे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळीही असाच चमत्कार घडणार का याकडेही लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात कधी नव्हे ऐवढा भाजपच्या उमेदवार कांचन कुुल यांच्या प्रचाराचा जोर लावला होता. याच प्रचाराच्या ताकदीतवर मतदारांनी कुल यांना दमदार पसंती दिली असल्याचे अंदाजावरून लक्षात येत आहे; त्यामुळे खुद्द पवारांच्या लोकसभा क्षेत्रात विरोधकांचे प्राबल्य सध्या तरी दिसून येत आहे. परंतु, गेल्या वेळी 70 हजारांची आघाडी घेऊन विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना विजयाची पक्की खात्री आहे. सुळे या किमान 1 लाख मतांनी निवडून येतील, असा विश्‍वासही समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. 2009 मध्ये सुळे यांना 4 लाख 74 हजार मतदान झाले होते तर 2014 मध्ये त्या 3 लाख 76 हजार मताधिक्‍य घेवून विजयी झाल्या होत्या. त्या तुलनेत 2019 मध्ये त्यांचे मताधिक्‍य प्रचंड घटणार असले तरी त्यांच्या विजयाची खात्री दिली जात आहे. तर, भाजपचे समर्थक मात्र हा दावा खोडून काढीत आहेत.

राष्ट्रवादीचे जे तालूके आहेत त्या तालूक्‍यातील हजारो मते भाजपच्या उमेदवार कुल यांनी घेतली आहेत; त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या ट्रेलरवरुन तरी कांचन कुल यांचा विजय मानला जात आहे. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी सज्ज असल्या तरी भाजपमुळे त्यांच्या मतात होणारी घट राष्ट्रवादीला बेचैन करणारी आहे.

  • बारामतीत धाकधुक कायम…
    लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान संपल्यानंतर मतदार संघांचे अंदाज येऊ लागल्यानंतर भाजपचे वर्चस्व स्पष्ट होत असताना बारामतीत कमालीची धाकधुक वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विचारांची लोकसभेतील निवडणूक निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या वृत्तवाहीन्यांवर झळकली तर राष्ट्रवादीला कमी जागा मिळत असल्याचे आकडे बोलू लागल्याने बारामतीचा गड राखण्यात शरद पवार यांची खेळी यशस्वी ठरणार की पवार यांना बारामतीतच रोखण्याचा फॉर्म्युला यशस्वी ठरणार, याबाबत चर्चा झडत आहे.
  • 22 गावांची मत कोणाच्या पारड्यात?
    बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील 22 गावांतील पाण्याचा प्रश्‍न, दुहेरी टोल आकारणी, कर वाढ या व इतर उपेक्षित प्रश्‍नांचा खच बारामती मध्ये वाढला होता. हाच मुद्दा भाजपने हेरला आणि तो लावूनही धरला तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झल्याचे दिसले. जिरायती पट्ट्यातील पाण्यासाठीच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष, याच कारणातून जिरायती पट्ट्यातील मतदारांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, पुरंदर, भोर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघातही भाजपच्य बाजुने कौल पडला असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. यामुळे कोणाच्या पदरात झुकते माप पडले यावर निकाल ठरणार आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.