बारामतीत एकही नाही; भोर, पुरंदरमध्ये पेच

विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती

भोर/सासवड- जिल्ह्याच्या दहा विधानसभा मतदार संघातील उमेदवारीकरीता कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवरांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. यानुसार आज 20 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून लढण्यास एकही उमेदवार पुढे आलेला नाही. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील तर भोर मधून विधानसभा लढविण्यास इच्छूक असलेले संग्राम थोपटे यांच्यासह तीघांनी इच्छा व्यक्त केली आहे. आज, कॉंग्रेसने मुलाखती घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली.
पुणे येथील कॉंग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे निरीक्षक प्रकाश यलगुलवार, सत्यजित देशमुख, अल्का राठोड, माजी खासदार अशोक मोहळ आणि पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मुलाखती घेतल्या. याबाबतचा अहवाल पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवार निश्‍चित केले जातील, असे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

इंदापूरमधून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जुन्नमधून विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, खेडमधून अमोल पवार आणि दौंडमधून आत्माराम ताकवणे यांनी उमेदवारी मागितली आहे. यासह आंबेगाव मधून यशवंत पाचंगे, अशोक काळे. शिरूर मतदारसंघातून शिवदास काळभोर, कौस्तुभकुमार गुजर, महेश ढमढेरे. पुरंदर मधून जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी आमदार संभाजी कुंजीर, भोर विधानसभा मतदार संघातून आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार अशोक मोहळ यांचे चिरंजीव संग्राम मोहळ, डॉ. यमराज पारखी. मावळमधून निखिल कवीश्‍वर, खंडू तिकोने, चंद्रकांत सातकर, दिलीप ढमाले, शांताराम नरवडे, बाळू प्रताप. पुणे शहरालगत येणाऱ्या खडकवासला मतदारसंघातून मिलिंद पोकळे, श्रीरंग चव्हाण, सचिन बोराटे, संग्राम मोहोळ, लहू निवंगुणे, अर्चना शहा, बाळू प्रताप यांनी उमेदवारी मागितली आहे.

दरम्यान, माजी खासदार अशोक मोहोळ यांचे चिरंजीव संग्राम मोहोळ यांनी आमदार संग्राम थोपटे डावलून भोरमधून उमेदवारी मागितल्याने भोर कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. भोर मतदारसंघाची आमदारकी भोरमध्येच गेली अनेक वर्षे राहिली आहे. त्यामुळे या मतदार संघात समावेश असलेल्या मुळशीला यावेळी संधी देण्यात यावी, अशी मागणी मोहळ गटाकडून केली जात आहे. यामुळे या मतदारसंघात थोपटे विरूद्ध मोहळ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. तर, पुरंदरमधून जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याबरोबरच त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे संभाजीराव कुंजीर यांनीही उमेदवारी मागितल्याने पेच निर्माण झाला आहे.

  • युतीला सडतोड उत्तर देण्यासाठी…
    विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच या दोन्ही पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुलाखतील घेतल्यानंतर आज कॉंग्रेसनेही जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखली घेतल्या. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीबाबतही अद्याप संभ्रम असल्याने या दोन्ही कॉंग्रेसकडूनही युतीला सडततोड उत्तर देण्यासाठी तयारी ठेवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
  • मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवार :
    बारामती : 0, दौंड : 1, इंदापूर : 1, पुरंदर : 2, भोर : 3, मावळ : 6, जुन्नर : 1, आंबेगाव : 2, खेड :1, शिरूर : 3 आणि खडकवासला : 7
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)