बारामतीतील कालवा दुरूस्तीचा निधीही आडवला

नीरा डाव्या कालव्याची पडझड; सातत्याने मागणी करूनही शासनाचे दुर्लक्ष

दीपक पडकर

जळोची- बारामती तालुक्‍यात कालव्यातून आणि पाटापाटाने खेळणारे पाणी आता बंद होणार आहे. तालुक्‍याला दुष्काळी करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाने आखल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. याच कारणातून तालुक्‍यातील कालव्यांच्या दुरूस्तीकरिता मिळणारा निधीही अडवून ठेवल्यानंतर आता पाणी आडविण्याचेही धोरण भाजपने आखले आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत मिळालेले अपयश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर अशा पद्धतीची राजकीय खेळी भाजपकडून खेळली जात असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बारामती तालुक्‍याच्या पूर्वेकडील भाग जलसंधारण तसेच जलस्त्रोतांमुळे पाणीदार होवून तो समृद्ध झाला आहे. गेली अनेक दशकं केंद्रात असलेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वावर तसेच राज्यात अजित पवार यांचा असलेला दबदबा यामुळे बारामती तालुक्‍याला पाणी कधी कमी पडले नाही. तालुक्‍याचा जिरायती भाग वगळता अन्य तालुका हिरवाईने नटलेला नेहमीच पहायला मिळाला आहे. हिच बाब आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या डोळ्यात सलू लागली असून बारामतीचे पाणीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातूनच नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काढला आहे.

मात्र, पाणीच नाही तर नीरा डाव्या कालव्याच्या दुरूस्तीकरिता येणारा निधीही सरकारकडून अडविण्यात आला आहे. जलसंपदा विभागासह संबंधीत विभागांकडे याबाबत स्थानिक प्रशासनाद्वारे मागणी केलेली आहे. याकरिता अजित पवार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला असला तरी बारामतीतील कालव्या दुरूस्तीकरिता निधी आलेला नाही. ज्या कालव्याचे पाणी बंद करण्याचा आदेश काढण्याबाबत भाजपकडून हालचाली सुरू आहेत. त्याच, नीरा डावा कालव्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हा कालवा केंव्हीही फुटण्याचा धोका आहे.

देशातील काही मोजक्‍या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे की, ज्याची स्वतःची जलनिती आहे. परंतु, केवळ पवार यांची कोंडी करण्याच्या उद्देशातून जलनितीची अमंलबजावणी करणाऱ्या जलसंपदा विभागाकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाण्याच्या मुद्यावर राजकारण केले जात आहे. बारामती तालुक्‍यातील कालव्यांची दुरवस्था झाल्यानंतर याकरिता विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे लावून धरण्यात आली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करीत हा निधीच आडविण्यात आला आहे. यामुळेच गेल्या चार ते पाच वर्षात बारामती शहरातून वाहणाऱ्या निरा-डाव्या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरुवस्था झाली आहे.

बारामती व इंदापूर तालुक्‍यासाठी नीरा डावा कालवा 1881 मध्ये बांधण्यात आला. सध्याची या कालव्याची स्थिती पाहता या कालव्याचे अस्तरिकरण पूर्णत: उखडले आहे. काही ठिकाणी असलेल्या पुलांचे दगडे निखळले आहेत. मोऱ्यांही फुटल्या आहेत. निरा डावा कालव्यात 62 वितरिका (फाटे) आहेत. यातील बऱ्याच वितरिका नादुरुस्त असल्यामुळे या कालव्याच्या दुरूस्तीकरीता निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. माजी उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे विद्यमान आमदार अजित पवार यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु, केवळ राजकीय हेतुनेच हा निधी दिला गेला नसल्याची वस्तुस्थिती आता याच कालव्याचे पाणी बंद करण्याच्या निर्णयामुळे समोर येवू लागली आहे.

  • इंदापुरलाही जाते पाणी…
    बारामतीला नियमबाह्य पाणी जात असल्याचे कारण पुढे करून हे पाणी बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेतला जात असला तरी हे पाणी केवळ बारामतीतच वापरले जात नाही तर पुरंदरमधील नीरा परिसरासह या कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी वरदान ठरत आहे. परंतु, केवळ बारामतीला पाणी नको म्हणूनच भाजपचा हा खटाटोप सुरू आहे. बारामती विभागात अनेक भागात या कालव्याचा भरावा खचला आहे. पूर्वी 10 ते 12 फूट रुंदी असणारा भराव केवळ 3 ते 5 फुटावर आला आहे. तसेच अस्तिरीकरण आणि पायऱ्या उखडल्या आहेत, हे काम करणे अवघड नाही परंतु, याकडे सरकारकडून पूर्वी पासूनच दुर्लक्ष केले गेले आहे.
  • आम्ही कधी दुष्काळाचं राजकारण केले नाही आणि यापुढेही करणार नाही. सध्या, लोकांना पाणी देण्याची गरज आहे. पाणी वाटपाचे अधिकार सत्ताधाऱ्यांकडे आहेत, त्यांनीच याबाबत योग्य काय ते निर्णय घ्यावेत.
    – अजित पवार, आमदार, बारामती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.