बारामतीची वैद्यकिय शिक्षणातही भरारी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश

जळोची- पुणे शहराला विद्यानगरी म्हंटले जात असले तरी बारामतीनेही स्वत:ची ओळख शिक्षण नगरी निर्माण केली आहे. येथील शिक्षणक्षेत्राने आणखी एक पाऊल पुढे टाकून वैद्यकिय शिक्षण क्षेत्रातही भरारी घेतली आहे. महाराष्ट्रातील तालुकास्तरीय दुसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची बारामतीत उभारणी करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी 100 जागांसाठी प्रवेश सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बारामती एमआयडीसी परिसरात 23 एकर क्षेत्रावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासाठी 656 कोटी खर्च करून 11 लाख स्वेअर फुट बांधकाम क्षेत्र असलेली सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. तर, उर्वरित कामांसाठी शासनाकडून 250 कोटीचा निधी अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाविद्यालयासाठी राज्य शासनाकडून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व निवासी जुनिअर व सिनिअर डॉक्‍टर, अशा 120 लोकांच्या नियुक्‍या पूर्ण झाल्या आहे. बारामतीमधील तीन शासकीय रुग्णालये संलग्न करून महाविद्यालयाला मान्यता घेतली जाणार आहे. या महिनाखेर पर्यत ही रुग्णालये व महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)च्या समितीकडून येत्या तीन-चार दिवसात पाहणी केली जाण्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मात्र, बारामतीतील सिल्व्हर ज्युबली उपजिल्हा रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय आणि रूई येथे ग्रामीण रुग्णालय या तीनही रुग्णालयांचा वापर महाविद्यालयासाठी केला जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे व महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजयकुमार तांबे यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया समोर सादरीकरण करून आवश्‍यक कागदपत्रे सादर केली व अनेकवेळा पाठपुरवा केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 • वैद्यकीय महाविद्यालय व उपलब्ध सुविधा
  अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर – 11
  सिटीस्कॅन मशीन – 01
  एमआरआय मशीन – 01
  सौर प्रकल्प – 01
  अतिदक्षता विभाग – 03
  न्याय वैद्यकीय शास्त्र -01
  निवासी डॉक्‍टर्स,परिचारिका, विद्यार्थी यांच्यासाठी श्रेणीनुसार 60 तयार शासकीय निवासस्थाने.
 • असा मिळणार प्रवेश..
  एकून क्षमता – 100 जागा
  इतर राज्यातील 15 टक्के
  महारष्ट्रातील गुणवत्तेनुसार 85 टक्के प्रवेश
 • ईटीपी प्रकल्प
  रक्त व अन्य विघटनाकरिता ते कमीतकमी पर्यावरणीय इलेक्‍ट्रोलाइटिक टिन प्लेट करून थेट ड्रेनेजला सोडण्यात येतात. त्यामुळे स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही, कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. या मुख्य उद्देशाने 80 किलोलिटर क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 • एसटीपी प्रकल्प…
  राज्यातील नव्हे देशातील पाणी प्रश्‍न दिवसेदिवस गंभीर होत आहेत. आगामी काळामध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब हिशोबाने वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सांडपाण्याचा पुनर्वापर होणे गरजेचे असल्याने प्रत्येक दिवशी 400 किलोलिटर क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 • महाविद्यालयासाठी प्राध्यापकांचीही नियुक्ती झाली असून ते सर्व रुजू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासाठी इमारत उभारणी पूर्ण झाली आहे. मे अखेरपर्यंत मान्यतेचा निर्णय होऊ शकतो. लवकरच महाविद्यालय सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
  – डॉ. संजयकुमार तांबे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.