बारामतीचा गड राखला

सुप्रिया सुळे 1 लाख 55 हजार मतांनी विजयी

जिल्हा प्रतिनिधी

पुणे- बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅटट्रीक साधली. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. बारामती काबीज करण्याककरिता मोठी तयारी केलेल्या भारतीय जनता पक्षाला सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सुळे यांच्या विजयाने कुल घराण्याने पवार यांच्या विरोधात केलेले तिसरे राजकीय बंडही मोडीत निघाले आहे. तर, 2014 मध्ये ज्या विधानसभा मतदार संघात सुळे यांना कमी मतदान झाले होते, त्याच ठिकाणी त्यांना एक लाखापेक्षा अधिक मतं मिळविली आहेत.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना 6,83,352 मते, भाजपच्या उमेदवार कांचन कुल 5,28,329 मते तर वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडाळकर यांना 43,922 मते मिळाली आहेत. यातून सुळे यांनी 1,55,023 मतांनी आघाडी मिळवीत विजय मिळवला आहे. बारामती मतदारसंघातील दौंड आणि खडकवासला या दोनच विधानसभा मतदारसंघात सुळे यांना कमी मतदान झाले. दौंडमध्ये कांचन कुल यांच्यापेक्षा सुळे या 10 हजारांनी त्या मागे होत्या तर खडकवासलामध्ये त्यांना 25000 हजार मतदान कमी झाले. मात्र, याउलट बारामतीसह भोर, पुरंदर आणि इंदापूर या तीन तालुक्‍यांतन सुळे यांना मोठे लिड मिळाले. यामुळे सुप्रिया सुळे यांनी सुरवातीच्या फेरीपासूनच आघाडी घेत वर्चस्व राखले होते.

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होत्या. खासदार सुळे यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुपटीने मताधिक्‍य वाढवीत दणदणीत विजय मिळवला. दौंडमधील कुल कुटुंबियांचे पवार यांच्या विरोधातील हे तिसरे राजकीय बंड होते. त्यामुळे कुल यांचे बंड यशस्वी होणार की, सुळे खासदारकीची हॅटट्रीक साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, सुळे यांनी लोखांचे लीड घेत विजय मिळवीत कुलांचे बंड मोडून काढले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असताना बारामतीसह अन्य तालुक्‍यातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे याच विजयी होणार, यावर शिक्का मोर्तब झाले होते. देशात आणि राज्यात भाजपला मोठे यश मिळाले असताना बारामती लोकसभा मतदार संघात मात्र, भाजप यावेळीही शिरकाव करू शकला नाही. यामुळेच या मतदार संघातील भाजपसह रासपच्या कार्यकर्त्यांत निरव शांतता पसरली आहे. याशिवाय मावळ लोकसभा मतदार संघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने याचे पडसाद बारामतीतही उमटले सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतरही बहुतांशी ठिकाणी जल्लोष कमी-अधिक प्रमाणातच पहायला मिळाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.