बारामतीकरांना दिलासा

संग्रहित छायाचित्र....

नगर परिषदेकडून कोणतीही कर, दरवाढ नाही : 319 कोटी 90 लाख 85 हजार खर्चाचा अर्थसंकल्प सादर

बारामती- बारामती नगर परिषदने कोणतीही करवाढ व दरवाढ न करता 2019-20 चा 399 कोटी 94 लाख 49 हजार 957 रुपये जमेचा, 319 कोटी 90 लाख 85 हजार रुपये खर्चाचा तर 3 लाख 64 हजार 957 रुपये शिलकीचा 154 वा अर्थसंकल्प आज (बुधवारी) सादर केला. विकासकामांवर लक्ष केंद्रित करीत सर्व प्रभागांसाठी भरीव तरतूद तरतूद करण्यात आली.
बारामती नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, उद्यान तसेच दिवाबत्ती विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. नीरा डावा कालवा सुशोभिकरण, स्टॉम वॉटर लाईन, प्राथमिक शाळा बांधणे, शहारातील विविध ठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शिवसृष्टी, कविवर्य मोरोपंत यांचे स्मारक बांधणे, राष्ट्रध्वज स्तंभ उभारणे आदिंसह पंतप्रधान आवास योजने अंतर्गत विकास घरे बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महिलांसाठी सुलभ शौचालय आदींसह विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहार साफसफाईसाठी 5 कोटी 93 लाख 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान विभागासाठी निसर्गव्रती बारामती योजनेंतर्गत शहारातील लहान मोठी उद्याने विकासीत करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात 4 कोटी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहारात सर्व ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यासाठी 4 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पाप्रसंगी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, संजय संघवी, सत्यव्रत काळे, नवनाथ बल्लाळ, सुरज सातव, गणेश सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश भोकरे, सुधीर पानसरे, राजेंद्र बनकर, अतुल बालगुडे, कुंदन लालबिगे, संतोष जगताप, बाळासाहेब सातव, बाळासाहेब जाधव, समीर चव्हाण, नगरसेविका सुहासीनी सातव, कामल कोकरे, निलीमा मलगुंडे, सीमा चिंचकर, सुरेखा चौधर, अनिता जगताप आदींसह नगर परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 • केवळ स्मारक ही संकल्पना नाही – गुजर
  शहरातील विविध विकासकामांवर लक्ष केंद्रित करत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान विभाग आदींसह नीरा डावा कालवा सुशोभीकरण शिवसृष्टी यासाठी तरतूद करण्यात आली आहे. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीची गरज काय अशी विचारणा यावेळी सभागृहात झाली मात्र, केवळ स्मारक ही संकल्पना नसून अंतर्गत सोयीसुविधा सुशोभीकरण व वाचनालय या बाबींचा देखील यात समावेश आहे. सामाजिक शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक विकास समाजाला तारी, नका होऊ सांस्कृतिक विकासाचे मारेकरी, असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी स्पष्ट केले.
 • सर्वाधिक निधींची कामे…
  वाहतूक व्यवस्था 5 कोटी, सीसीटीव्ही कॅमेरे 1 कोटी, पुतळे स्मारके 1 कोटी, नीरा डावा कालवा सुशोभीकरण 9 कोटी, शिवसृष्टी 1 कोटी, मोरोपंत स्मारक 50 लाख, नदीसुधार प्रकल्प 1 कोटी, निसर्गवृत्त बारामती 2 कोटी, स्ट्रोम वॉटर लाईन 5कोटी, नवीन मटन मार्केट 1 कोटी, उद्योग भवन 5कोटी, रेल्वे भुयारी रस्ता 4 कोटी, रस्ते डांबरीकरण 15 कोटी, दलित वस्ती सुधारणा 3 कोटी, पंतप्रधान आवास योजना 2 कोटी, स्ट्रीटलाइट 3 कोटी.
 • अर्थसंकल्पात यांत्रिकीकरणावर भर -सातव
  कोणतीही करवाढ अथवा दरवाढ न करता बारामती करण्यासाठी 3 लाख 64 हजार 557 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र, त्यापटीत वाढत नाही मनुष्यबळाचा अभाव लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे. आरोग्य स्वच्छता व साफसफाई यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये अद्यावत मशिनरीचा समावेश आहे. शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी तसेच अजित पवार यांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करण्यासाठी उद्यान विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यंदाचा अर्थसंकल्प बारामतीकरांचा सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी स्पष्ट केले.
 • कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला अर्थसंकल्प हा आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सादर करण्यात आला आहे. 319 कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना 125 कोटींच्या तरतुदीचा फुगवटा आहे. केवळ तीनशे कोटींचा आकडा पार करण्यासाठी नगर परिषदेने हा खटाटोप केला आहे. 125 कोटींच्या तरतुदी निव्वळ बोगस आहेत.
  – सुनील सस्ते, विरोधी पक्षनेता, बारामती नगर परिषद
 • बारामती नगर परिषदेने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये विविध विकासकामांवर भर देण्यात आला आहे. शहरातील स्वच्छता व आरोग्य साफसफाई या कामांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे, त्यानुसार या कामांसाठी भरीव तरतूद देखील करण्यात आले आहे.
  – योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)