बायको, मेव्हुणी, सासुच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

शिरूर तालुक्‍यातील मलठण येथील घटना

सविंदणे-बायको, मेव्हुणी, सासुच्या कायमच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मलठण (ता. शिरूर) येथील तरुणाने राहत्या घरात रविवारी सायंकाळी 4 ते 5च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

सागर रंगराव देशमुख (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत सागरची आई संगिता रंगराव देशमुख (वय 49, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागरची पत्नी धनश्री सागर देशमुख (वय 23), मेव्हुणी रूचिता मस्कु वाव्हळ (वय 24) व सासू नलिनी मस्कु वाव्हळ (वय 40, रा. तिघीही मलठण, ता. शिरूर) यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सागर याने साडेतीन वर्षांपूर्वी धनश्री हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यानंतर पत्नी धनश्री हिचे सागरशी भांडण व्हायचे, त्यामुळे ती नेहमी माहेरी निघून जायची. अधिक वाद नकोत या कारणास्तव सागर हा सुमारे दोन वर्षांपासून पत्नीसह विभक्त राहत होता. तरी सागर व धनश्री यांच्यात वाद सुरूच होते. धनश्री ही किरकोळ कारणांवरून त्याला शिवीगाळ करून अपमानित करत असे. दि. 21 जुलैला रात्रभर सागर व धनश्री यांची भांडणे सुरू होती. दुसऱ्या दिवशी सकाळी धनश्री ही तिच्या मुलीला घेऊन माहेरी निघाली तेव्हा सागरने विनवणी करूनदेखील शिवीगाळ करीत निघून गेली.

दोन दिवसांनी धनश्री हिची आई नलिनी व बहीण रूचिता हिने सागरच्या घरी येत सागरला शिवीगाळ व दमदाटी केली. सागरची आई व वडिलांना तुम्ही आमची मुलगी धनश्री हिला मारुन टाकले आहे, असे म्हणत होत्या. 27 जुलैला दुपारी तीनच्या सुमारास सागर हा धनश्री व त्यांची मुलगी शिवण्या हिस घरी आणण्यासाठी गेला; परंतु धनश्री हिने सागरला पुन्हा शिवीगाळ केली. सागर माघारी येत असताना धनश्री, सासु नलिनी व मेव्हुणी रूचिता यांनी त्यास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. गावातील मुख्य चौकात भररस्त्यात ही घटना घडल्याने अपमानित झाल्याची सल मनात ठेवत तो सारखाच रडत होता.

यामुळे शनिवारी रात्री तसेच रविवारी (दि.28) सकाळपासून राहत्या घरात स्वतःला कोंडून घेऊन झोपला होता. दुपारी चारच्या सुमारास सागरच्या आईने घरी येऊन पाहिले असता सागरने घराच्या स्लॅबच्या हुकाला गळफास घेतल्याचे दिसले. तातडीने त्याला शिरूर येथे उपचारासाठी नेले; मात्र डॉक्‍टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. या घटनेचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल शिंदे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.