बाजारातील अनधिकृत कट्ट्यांवर लवकरच हातोडा

बाजार समिती प्रशासकांची माहिती : पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती

पुणे – गुलटेकडी येथील मार्केटयार्डात विविध विभागात गाळ्यांसह हॉटेल्स, पतसंस्था आहे. काही हॉटेल्स, पतसंस्थानी आपल्या कार्यालयासमोर अनधिकृतपणे अतिरिक्त जागेत कट्टे बांधले आहे. यामुळे पावसाळ्यात बाजारात पाणी साचून व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, बाजारात अडथळा ठरणारे कट्टे हटविले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

मार्केटयार्डात गाळ्यांलगत पतसंस्था, हॉटेल्सची संख्या मोठी आहे. सध्या या पतसंस्था, हॉटेल्सधारक आपल्या कार्यालय, हॉटेलसमोर कट्टे बांधून त्या जागांचाही वापर व्यावसायासाठी करत असल्याचे चित्र बाजारात आहे. या कट्ट्यांमुळे बाजारातील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होतोच. मात्र, पावसाळ्यात या कट्ट्यांमुळे लगतच्या गाळ्यांसमोर पाणी साचून राडारोडा होतो. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. तर, बाजारातील व्यापारावर परिणाम होतो. त्याबरोबर पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे रोगराई होण्याची शक्‍यता जास्त असते. यापुर्वीही बाजार समितीने अनधिकृतपणे गाळ्यांसमोर बांधलेल्या कट्ट्यांवर कारवाई केली होती.

याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, “बाजारातील हॉटेल्स, पतसंस्था, विविध कार्यालयांनी बांधलेल्या कट्ट्यांची पाहणी केली जाईल. अडथळा ठरणारे सर्व कट्टे हटविण्याची कारवाई केली जाईल.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here