बहुळ येथे शेतकऱ्यांसाठी शेती शाळा प्रशिक्षण

महाळुंगे इंगळे : -चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शेती शाळा प्रशिक्षण कार्यक्रमाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. बहुळ येथे प्रथमच हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
उसामधील हुमणी किडीचा जीवनक्रम ओळखून कीड नियंत्रण करताना फक्त रासायनिक कीटक नाशकांचा वापर करून काहीच होणार नाही, तर यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा मोहीम स्वरूपात अवलंब करणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी खेड तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले. क्रॉपसॅप व ऊस विकास कार्यक्रम आणि हुमणी कीड नियंत्रण अभियान अंतर्गत बहुळ येथे ऊस शेतकरी शेतीशाळा प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या निर्मला पानसरे, सरपंच गणेश वाडेकर, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, कृषि सहाय्यक मेघा कांबळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे अधिकारी, तुकाराम काटकर, पंकज बापू हरगुडे, मोहन तांबे, माणिक साबळे आदींसह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शेतीशाळा कार्यक्रमामध्ये ऊस पिकावरील हुमणीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, पिकावरील किडीचे कमी खर्चात नियंत्रण, उत्पादन वाढविणे, मका पिकावरील लष्करी अळी उपाययोजना, इतर पिके, मशागत पद्धती आणि कृषि विभागाच्या योजना, यांत्रिकीकरण योजनाची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. निर्मला पानसरे यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेण्याचे सर्वाना आवाहन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)