बहरलेल्या रानमेव्याला “वैशाख वणवा!’

  • रानवाटा : बोर, करवंद, जांभळाला झळ

कुसगाव बुद्रुक (वार्ताहार) – वैशाख महिन्याची चाहूल लागतानाच रणरणत्या उन्हाच्या झळांनी ग्रामीण भाग हैराण झाला आहे. डोंगर पठारावर राहणारा व रानोमाळ फिरून “रानमेवा’ गोळा करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करणारांचा मात्र यंदा डोंगरावरील वणव्यांमुळे रानमेवा नाहिसा झाला आहे. वैशाख सुरू झाला की पर्यटक “डोंगरची काळी मैना’ चा स्वाद घेण्यासाठी येतात. पूर्वी मावळातील प्रत्येक डोंगरावर रानमेवा बहरायचा. परंतु झाडांची होणारी कत्तल, डोंगरावरील वणव्यांमुळे रानमेवा कमी झाला आहे. बोर, करवंद, जांभळे, आंबोळी, तुती, आंबे यांसारखा रानमेवा आता दुर्मिळ होत आहे.

पूर्वी सर्वत्र दिसणारा रानमेवा आता ठराविक ठिकाणीच दिसत आहे. बाजारात, गल्ली-बोळात, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी रानमेवा विक्रेते दिसायचे. काही महिला डोक्‍यावर टोपली घेऊन रानमेवा विकताना दिसायच्या. हल्ली मात्र हे चित्र दुर्मिळ झाले. डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळेही रानमेवा घटला. वृक्षतोडीनेही रानमेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कातकरी, ठाकर सामाजातील महिला डोंगर, टेकड्या, कपारीत जाऊन रानमेवा गोळा करतात. अनेकदा करवंदाच्या जाळ्यामुळे इजा होते. रानमेव्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कष्टाच्या तुलनेने कातकरी-ठाकर समाजाला अपेक्षित भाव मिळत नाही.

रानमेव्याच्या प्रत्येक फळांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. रानमेवा गुणकारी व त्याची चवही तृप्त करणारी आहे. डोंगरची “काळी मैना आली रे’ या सूरातच मावळात रानमेव्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असे. मात्र गेल्या काही वर्षांत मावळातील रानमेव्याचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

पठारावरील विहिरींनी तळ गाठला 
अनेक गावांतील विहिरींनी आताच तळ गाठला असून आता कोरडेठाक कातळ दृष्टीस पडू लागले आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने गावा-गावांतून पाणी टॅंकरची मागणी वाढू लागला आहे. पाणी योजना नसलेल्या गाव, वाड्या-वस्तींना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)