बस बांधणी गॅरेजला आग; सव्वा तीन कोटी रुपयांचे नुकसान

कोणतीही जीवितहानी नाही

कापूरहोळ- शिंदेवाडी (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 20) सकाळी क्‍लासिक कोच बिल्डर्स या बस बांधणीच्या गॅरेजला अचानक आग लागल्याने 13 ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. सुर्देवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे आटोक्‍यात आणण्यासाठी दोन तास लागले. आगीत अंदाजे सव्वा तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस आणि महसुल विभागाने सांगितले.

पुणे-सातारा महामार्गा लगतच्या शिंदेवाडी गावच्या हद्दीत क्‍लासिक कोच बिल्डर्स हे बसगाड्या बांधणीचे गॅरेज आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गॅरेजमधील एक बस पाठीमागे घेण्यासाठी सुरु केली असता बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर थोड्याच वेळात आग संपूर्ण गॅरेजमध्ये पसरली. त्यामुळे दुरुस्तीसाठी आलेल्या इतर बसला सुद्धा आग लागली. आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे 13 बस जळून खाक झाल्या आहेत. सुमारे अर्ध्या तासाने पुण्याहून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली व त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरु झाले. आग मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याने पुण्याहून दोन आणि भोर नगरपालिकेची एक अशा आणखीन तीन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅरेजमधील तेरा ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. आग लागलेल्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अशातच आगीमुळे गाड्यांच्या टायरचे स्फोट होऊन त्याचे तुकडे आजुबाजूस उडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घटनास्थळी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर महसूल विभागाचे अधिकारी गायकवाड, तलाठी किशोर पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत अंदाजे सव्वा तीन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शिंदेवाडीचे तलाठी किशोर पाटील यांनी वर्तविला आहे.

  • अरुंद रस्त्यामुळे आली अडचण
    अरुंद रस्ता असल्याने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी नेण्यास अडचण आली. दुसऱ्या बाजूने गॅरेजच्या पाठीमागे बंब नेऊन सुमारे तीन अग्निशमन दलाच्या बंबांच्या सहयाने अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक यांनी 2 तासानंतर आग आटोक्‍यात आणली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.