बलात्कारप्रकरणी दोषीला होणार फाशीची शिक्षा

महत्वपूर्ण विधेयकाला लोकसभेची मंजुरी
नवी दिल्ली – फौजदारी कायद्यातील दुरूस्तीशी संबंधित अध्यादेशाची जागा घेणाऱ्या महत्वपूर्ण विधेयकाला लोकसभेने मंजुरी दिली. त्या विधेयकात 12 वर्षांखालील बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ आणि उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणांनी देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर केंद्र सरकारने 21 एप्रिलला फाशीच्या शिक्षेची तरतूूद असणारा अध्यादेश लागू केला. त्याची जागा घेणारे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार महिलेवरील बलात्कार प्रकरणी ठोठावण्यात येणाऱ्या किमान शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार 7 ऐवजी 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा होईल. अशा प्रकरणात शिक्षा वाढवून ती जन्मठेपही केली जाऊ शकते. 16 वर्षांखालील मुलीवरील बलात्कारप्रकरणी किमान शिक्षेची तरतूद 10 वर्षे तुरूंगवासावरून वाढवून 20 वर्षे इतकी करण्यात आली आहे. अशा प्रकरणात शिक्षा वाढवूून मरेपर्यंत तुरूंगवास ठोठावला जाऊ शकतो. 16 वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणीही मरेपर्यंत तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

विधेयकात बलात्काराच्या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. याशिवाय, खटल्याची सुनावणी दोन महिन्यांत पूर्ण करावी लागेल. 16 वर्षांखालील मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू शकणार नाही.

या विधेयकामुळे सरकार महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी किती बांधील आहे हे समोर येतंय. देशातील महिलांना सुरक्षित वाटावं हीच आमची भावना आहे’, अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे.
दरम्यान, कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र भावना उमटल्या होत्या. बलात्कारातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. यानंतर कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)