बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघ सज्ज ; आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना

साऊदम्प्टन: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर तिसरा सामना जिंकून कसोटी मालिकेत झुंजार पुनरागमन करणारा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध उद्या (गुरुवार) सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यातील चमकदार कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघाला ही सर्वोत्तम संधी आहे.

एजबॅस्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला अनेकदा कोंडीत पकडले. मात्र हा कसोटी सामना फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला केवळ 31 धावांनी गमवावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र इंग्लंडने भारताला डावाने पराभूत करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या वेळी इंग्लंड संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्याचीच चिन्हे दिसत होती. परंतु भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना 203 धावांनी जिंकताना ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी करणाऱ्या भारतीय संघाला इतिहास घडविण्याची संधी आहे. याआधी 1936 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सर डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली 0-2 अशा पिछाडीवरून ती कसोटी मालिका 3-2 अशी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याची पुनरावृत्ती विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ करणार का, हाच समस्त भारतीय पाठीराख्यांच्या मनातील प्रश्‍न आहे.

विशेष म्हणजे रोज बाऊल स्टेडियममध्ये होणारा हा केवळ तिसरा कसोटी सामना आहे. इंग्लंडने या मैदानावर 2014 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताला 266 धावांनी पराभूत केले होते. त्या पराभवाची परतफेड करण्याची भारतीय संघाला यंदा संधी आहे. भारताच्या विजयाची मदार पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांची कामगिरी आणि विराट कोहलीसह पुजारा, रहाणे आदी फलंदाजांवर राहील.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मालिकेत पडलेल्या इंग्लंडच्या 46 बळींपैकी 36 बळी घेतले आहेत. तसेच विराटने तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावांत 97 आणि 103 धावांची खेळी करीत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. अश्‍विनच्या दुखापतीचे सावट भारतीय संघासमोर आहे. अश्‍विनने आज सराव केला. परंतु गरज भासल्यास त्याची जागा घेण्यासाठी रवींद्र जडेजा सज्ज आहे. पृथ्वी शॉ किंवा हनुमा विहारी यांचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होण्याबद्दल अद्यप काहीही घोषणा झालेली नाही.

इंग्लंडसमोरही बेन स्टोक्‍स आणि ख्रिस वोक्‍स यांच्या दुखापतीसह फलंदाजांच्या अपयशाचे आव्हान आहे. या दोघांनीही काही वेळ सराव केला. परंतु गरज भासल्यास जेम्स व्हिन्सेला पाचारण करण्यात आले आहे. व्हिन्सेचा समावेश झाल्यास तो अँड्रयू स्ट्रॉसनंतर कूकचा 13वा सलामी साथीदार ठरेल. जोस बटलरला अन्य फलंदाजांची साथ आवश्‍यक असून कर्णधार जो रूटचे अपयश इंग्लंडसाठी चिंताजनक आहे. कूकनेही पाच डावांत केवळ 80 धावा केल्या असून चौथ्या कसोटीत अपयशाची मालिका खंडित करण्याचा त्याचा प्रयत्न राहील.

प्रतिस्पर्धी संघ –
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, महंमद शमी व जसप्रीत बुमराह.

इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, कीटन जेनिंग्ज, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, ऑलिव्हर पोप, मोईन अली, अदिल रशीद, सॅम करन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्‍स, बेन स्टोक्‍स व जेम्स व्हिन्से.
सामन्याची वेळ- दुपारी 3-30 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)